रायगड : जिल्ह्यात वीकेंड लाॅकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्वच व्यवहार ठप्प हाेते. चाैका-चाैकामध्ये असणारे पाेलीस विनाकारण फिरणाऱ्यांवर नजर ठेवून हाेते. जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा, दुकाने बंद हाेती. काेराेनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साेमवार ते गुरुवार मिनी लाॅकडाऊन आणि शुक्रवारी रात्री ते साेमवारी सकाळी या कालावधीत वीकेंड लाॅकडाऊन जाहीर केला हाेता. वीकेंड लाॅकडाऊनला नागरिकांसह विविध व्यापारी, व्यावसायिक यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. सकाळपासूनच रस्त्यावर शुकशुकाट हाेता. नेहमीच गजबजणारे अलिबाग येथील भाजी मार्केट, एसटी स्टॅण्ड परिसर, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैक आज निर्मनुष्य झाले हाेते. मेडिकलची दुकाने, रुग्णालये सुरू हाेती. अलिबाग एसटी आगारातून तुरळक फेऱ्या झाल्या.बीएसएनएल बायपास राेड, गाेंधळपाडा, एसटी स्टॅण्ड, ठिकरुळ नाका, पेण, राेहा, माणगाव, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पाेलादपूर, उरण, पनवेल, खालापूर, कर्जत, तळा आणि महाडमधील बाजारपेठा बंद हाेत्या. येथील प्रमुख नाक्यांवर पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पाेलीस चांगलीच समज देत हाेते. विविध क्षेत्रात काम करणारे कामगार काेराेना चाचणी करण्यासाठी सरकारी रुग्णालयामध्ये जात हाेते. त्यांच्याकडे असणारा नाेंदणी अर्ज तपासून पाेलीस त्यांना परवानगी देत हाेते; तसेच अन्य कारणांनी रुग्णालयात जाणाऱ्यांना पाेलिसांनी सुट दिली हाेती. तर, हाॅटेल, खानावळ, रेस्टाॅरंटचा व्यवसायही ठप्प हाेता. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. तर, पार्सल सेवा देण्याचे धाडस हाॅटेल व्यावसायिक करत नसल्याचे दिसून आले. तीन आसनी रिक्षा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक, एसटी स्टॅण्ड परिसरात असणाऱ्या सहा आसनी रिक्षाही बंद हाेत्या. कडक लाॅकडाऊन असल्याने नागरिक घराबाहेर पडणार नसल्याने आम्ही व्यवसाय बंद ठेवल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे किनाऱ्यावर शांततामुरूड जंजिरा : वीकेंडला अलिबाग, नागाव, काशीद, मुरुड, श्रीर्वधन, दिवेआगरचे समुद्र किनारे गजबजलेले असतात; मात्र वीकेंड लाॅकडाऊनमुळे समुद्र किनारे ओस पडले हाेते. दोन आठवड्याांपासून पर्यटकांची संख्या रोडावल्याने हॉटेल व लॉजिंग व्यवसायाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्शभूमीवर होणारी संचार बंदी व लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी घरातच राहणे पसंत केल्याने नेहमी पर्यटकांनी फुलणारे किनारे आता सुनेसुने झाले आहेत. वीकेंड लॉकडाऊनमुळे समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या सर्व टपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
नागोठणे झाले ‘लॉक’नागोठणे : महाराष्ट्र शासनाकडून शनिवार आणि रविवार लॉकडाऊनचा आदेश देण्यात आला आहे. याला शनिवारी संपूर्ण नागोठणे शहरात पूर्णपणे सहकार्य करून दूध आणि औषधांची दुकाने वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आला. तीन तसेच सहा आसनी रिक्षासुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कायम गजबजलेल्या मुंबई- गोवा महामार्गावरसुद्धा वाहने नसल्याने महामार्ग पूर्णपणे मोकळा होता. येथील एसटी बसस्थानकावर दररोज किमान दोनशे एसटी बसेस येत असतात. मात्र, पहाटेपासून दुपारपर्यंत एकही एसटी न आल्याने बसस्थानकातसुद्धा सामसूम होती. स्थानकात सेवेत असणारे वाहतूक नियंत्रक चंद्रकांत भोईर यांना विचारले असता, शुक्रवारी रात्रीच्या वस्तीवरील गाड्या संबंधित ठिकाणी गेल्याच नसल्याने सकाळी गाड्या आल्याच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर प्रवासी नसल्याने एसटी बसेस मूळ ठिकाणांतून सुटल्या नसल्याचे सांगितले. प्रवासी असतील तर आगारातून बस उपलब्ध होतील; परंतु लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी घरातून बाहेर पडणे टाळले असल्याने रविवारीसुद्धा हीच परिस्थिती असेल असे ते म्हणाले.
रोह्यात कडकडीत बंदराज्य शासनाने केलेल्या वीकेंड लॉकडाऊनच्या आवाहनाला पूर्णतः प्रतिसाद देत रोहा शहर कडकडीत बंद करण्यात आले. अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या व्यापाऱ्यांनी ही शनिवारी स्वतःहून १०० टक्के बंद पाळला आहे. त्यामुळे रोहा शहारात सर्वत्र शुकशुकाट होते. रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते संध्या. ७ पर्यंत सुरू राहतील असे कळविले होते. त्यानंतर औषधे व दुध डेअरी वगळता इतर सर्व दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने शनिवारी आपली दुकाने बंद ठेवून रोह्यात १०० टक्के बंद पाळला, दुपारनंतर तर रोहा बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाले.
कर्जतमधील गजबजलेले रस्ते निर्मनुष्य
कर्जत : शनिवार आणि उद्या रविवार रोजी वीकएन्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने एरव्ही कर्जत शहरातील गजबजलेले रस्ते एकदम निर्मनुष्य दिसत होते. तसेच नेहमीच फेरीवाल्यांनी गराडा घातलेले रस्ते कमालीचे मोठे दिसत होते. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद होते. व्यापाऱ्यांनी विक एन्ड लॉकडाऊन आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त पाठिंबा दिला. . कडाव व कशेळे भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने तेथील व्यापारी वर्गाने तीन - चार दिवसांपूर्वी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व तो शंभर टक्के यशस्वी सुद्धा केला. शनिवारी कर्जत बाजारपेठेत केवळ औषधे, दूध डेअरी ही दुकाने उघडी होती त्यामुळे बहुतांश रस्ते निर्मनुष्य होते. उद्याही अशीच परिस्थिती असेल; मात्र काल दोन दिवसांच्या विक एन्ड लॉकडाऊनमुळे ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होती.