अलिबाग : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केल्याने पुन्हा एकदा समुद्र, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन बंद झाले आहे. त्यामुळे हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांचे पुन्हा नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. मिनी लॉकडाऊन जाहीर झाल्याने समुद्रकिनारे पुन्हा ओस पडू लागल्याने, समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्यांना याचा फटका बसला आहे.रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत सहा हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार ७९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात वर्षभरात ७६ हजार ९९३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती, यापैकी ६९ हजार ५०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.व्यावसायिक चिंतीतमार्च २०२०ला कोरोनामुळे सहा महिने लॉकडाऊन झाले. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली आणि हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू झाले. मार्च २०२१ला पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने रायगडात रुग्णंसख्या वाढू लागली व पर्यटकांची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकही अडचणीत येऊ लागले. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिनी लॉकडाऊनची घोषणा केल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ लॉकडाऊनराज्यासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण दोन दिवस शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. यावेळी सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने दोन दिवस जिल्ह्यातील रस्ते निर्मनुष्य होणार आहेत. पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, धार्मिक, ऐतिहासिक स्थळेही बंद राहणार असल्याने पर्यटकही येणार नाहीत. याचा फटका हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांना बसणार आहे.श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन कोलमडलेदिघी : राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन घोषित केल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्या मार्चमधील पूर्णतः लॉकडाऊननंतर निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला होता. या सर्व बाजूने कोलमडलेले जनजीवन ‘मिशन बिगीन’च्या माध्यमातून पर्यटनाला मुभा दिल्याने सावरत असतानाच, मिनी लॉकडाऊनमधील शनिवार, रविवार या दोन दिवसांतील पूर्णत: टाळेबंदीने येथील व्यावसायिकांचा रोजगार हिरावला आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनचा मोठा फटका येथील हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. इतर जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकणातील पर्यटनातून मिळणाऱ्या रोजगारांवर गदा आल्याचे येथील व्यावसायिक सांगतात.
CoronaVirus Lockdown News: जिल्ह्यात समुद्रकिनारा पुन्हा सुनासुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 12:13 AM