CoronaVirus Lockdown News: रसायनीत व्यापाऱ्यांचा रास्ता रोको; ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 11:51 PM2021-04-07T23:51:43+5:302021-04-07T23:52:01+5:30
मोहोपाडा, नवीन पोसरी, वावेघर बाजारपेठेत निषेधाचे बॅनर
मोहोपाडा/ रसायनी : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने अंशतः लाॅकडाऊन जाहीर केले आणि प्रत्यक्षात 'ब्रेक दि चेन’च्या नावाखाली संपूर्ण लाॅकडाऊन लागू केल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा आहे. रात्री आठनंतर संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असे आदेश असताना आणि विकेंडला कडक लाॅकडाऊन असताना त्याआधीच मंगळवारी दुपारी नवीन पोसरी, मोहोपाडा व वावेघर बाजारपेठेत शटर खाली करायला लावल्याने मोहोपाडा-नवीन पोसरी व वावेघर बाजारपेठेतील व्यापारी नाराज झाले आहेत. त्यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता मोहोपाडा शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी सरपंच संदीप मुंढे, वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश खारकर, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दीपक कांबळी, भाजपाचे विभागप्रमुख सचिन तांडेल, माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापाऱ्यांनी मोहोपाडा बाजारपेठेत सोशल डिस्टन्स पाळून हातात शासनाच्या लाॅकडाऊनचे निषेध दर्शविणारे बॅनर घेऊन व्यापाऱ्यांनी निषेध दर्शविला. यानंतर शिवाजी चौकात व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून लाॅकडाऊनचा निषेध केला. यानंतर मोहोपाडा व नवीन पोसरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा प्रवेशद्वार कमानीजवळ रास्ता रोको केला. याप्रसंगी काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती, तर वावेघर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही वावेघर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष तथा माजी उपसरपंच गुरुनाथ माली यांच्या मार्गदर्शनाखाली वावेघर प्रवेशद्वार कमानीसमोर रास्ता रोको करून शासनाच्या लाॅकडाऊनचा निषेध दर्शविला.
मोहोपाडा रसायनी परिसरात व्यापारी वर्गाकडून शासनाचा निषेध करून घोषणाबाजी काही वेळ सुरू होती, तर या लाॅकडाऊनचा सलून व्यावसायिकांनीही निषेध दर्शविला. लाॅकडाऊन लावणे योग्य नसल्याचे सांगून व्यापारी वर्गाने या लाॅकडाऊनला विरोध दर्शविला आहे. प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे आम्ही पालन केले आहे व करीत आहोत, असे मोहोपाडा, नवीन पोसरी व वावेघर बाजारपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज सोमाणी, सचिव अमित शहा, वावेघर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गुरुनाथ माली यांनी सांगितले.
लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकट येईल, त्यामुळे प्रशासनाने फेरविचार करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. नोकरांचा पगार, दुकानाचे भाडे, कर्जांचे हप्ते या सर्व समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याची भावना व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
व्यापारी असोसिएशनकडून निषेध
कोरोना संसर्ग रोखण्याच्या शासनाच्या कार्यात सर्व व्यापारी शासनासोबत आहेत. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये व्यापार्यांनी खूप आर्थिकहानी सहन केली आहे. कोरोना रोखण्यास लाॅकडाऊन हा एकमेव पर्याय नाही. शासनाने अत्यावश्यक सेवेत येत नसलेल्या इतर व्यापाऱ्यांचाही विचार करावा व लाॅकडाऊनची बंधने शिथिल करावीत. व्यापाऱ्यांच्या राज्य फेडरेशनने शासनाला विचार करण्यासाठी ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. व्यापाऱ्यांची मागणी मान्य झाली नाही तर ९ एप्रिलपासून सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवली जातील, मग व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले तरी चालेल. असे व्यापारी असोसिएशनचे सचिव अमित शहा यांनी सांगितले.