CoronaVirus Lockdown News: जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नाही, तर दोन दिवसांत दुकाने उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 11:49 PM2021-04-07T23:49:10+5:302021-04-07T23:49:26+5:30
अलिबागमध्ये व्यापाऱ्यांचा इशारा; पोलिसांच्या मदतीने बाजारपेठा केल्या बंद
अलिबाग : रायगड जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील बाजारपेठा बंद केल्या. प्रशासनाच्या या निर्णयामुळे हवालदिल झालेल्या दुकानदारांनी रायगड जिल्हा प्रशासनाकडे सोमवार ते शुक्रवार दुकाने उघडण्यासाठीचे निवेदन दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ असोसिएशनच्या मार्गदर्शनानुसार ८ एप्रिलपर्यंत प्रशासनाने दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली नाही, तर ९ एप्रिलपासून दुकाने उघडण्यात येतील, असा इशारा अलिबाग येथील दुकानदारांनी दिला.
जिल्हाभरातील दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी २ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्याबाबतचे निवेदन दुकानदारांनी अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना दिले आहे. त्याचबरोबर शासनाला दुकानदारांच्या भावना कळाव्यात यासाठी दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. जिल्हा प्रशासनातर्फे सर्जेराव म्हस्के पाटील यांनी स्वीकारले. किरकोळ दुकानदारांना दुकानाचे १५ हजार रुपये भाडे भरावे लागते. लाईट बिलाचे २ हजार रुपये भरावे लागतात. घराचा खर्च, मालकाला भाडे, लाईट बिल भरण्याचा तगादा त्यांच्या मागे कायम असतो. मागील लॉकडाऊनमध्ये दुकानदारांनी दुकाने बंद ठेवल्याने त्यांच्यावर उद्भवलेली परिस्थिती भयावह होती हे साऱ्यांना सर्वश्रुत आहे.
अनलॉक झाल्यानंतर दुकानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता पुन्हा एकदा दुकाने बंद करण्याची वेळ आली तर दुकानदारांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. यामुळे दुकानदारांची समस्या लक्षात घेऊन सोमवार ते शुक्रवार दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने ८ एप्रिलपर्यंत दुकाने उघडण्यासंदर्भात निर्णय घेतला नाही, तर ९ एप्रिल रोजी दुकाने उघडणार असल्याचा इशारा दिला.
तळा बाजारपेठेतील दुकाने सुरू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांचे निवेदन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरू ठेवून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याला विरोध करत तळा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याच्या आधारावर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊन काळापासून व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन जवळजवळ आठ महिने बंद होते. काहींनी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या परतफेडीचे हप्ते बँकेने सहा महिने थांबवले होते. परंतु, मार्च २०२१ मध्ये सर्व हप्ते व्याजासह वसूल केले.
व्यवसाय बंद असल्याने वीज बिल थकले होते, ते थकीत वीज बिलदेखील महावितरण कंपनीने व्याजासह दंडात्मक कारवाई करून वसूल केले. प्रत्येक संकटात व्यापाऱ्यांनी सरकारला साथ दिली आहे. परंतु, आता काळ कठिण असून, सरकारने कोणत्याही प्रकारची सवलत न देता ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू करून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने, आमच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हा व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.