बोर्ली-मांडला : राज्यात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन वाढत असलेल्या रुग्णसंख्येने जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली असून शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत कडक लाॅकडाऊन करण्यात आल्याने शुक्रवारी काशिद बीच वर शुकशुकाट होता, तर बोर्ली-मांडला परिसरात तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली.मागील वर्षी २२ मार्चपासून कोरोना महामारी तसेच तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत होऊन लोकांना मोठ्या प्रमाणात संकटांना तोंड देत सामना करावा लागला. अनलाॅकनंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना येथील बहुतांशी व्यावसायिकांनी पुन्हा कर्जबाजारी होऊन व्यवसाय सुरू केला होता. त्याला काही महिने लोटतात न लोटतात तोच कोरोना रोगाच्या दुसऱ्या वाटेने डोकेवर काढले. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने शासनाने पुन्हा मिनी लाॅकडाऊन करण्यात आल्याने येथील व्यावसायिक व नागरिकांचे कंबरडे मोडले असून पुन्हा लावण्यात आलेल्या मिनी लाॅकडाऊनमुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक कोरोनामुळे तर कर्जबाजारी लघुउद्योजक ते पर्यटनावर अवलंबून व्यावसायिक मेटाकुटीला आले असून पुन्हा मिनी लाॅकडाऊने त्रस्त झाले आहेत.
CoronaVirus Lockdown News: मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 1:10 AM