CoronaVirus Lockdown News: मिनी लाॅकडाऊनमुळे आता महिनाभर दाढी-कटिंग करावी लागणार घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 01:16 AM2021-04-09T01:16:50+5:302021-04-09T01:17:04+5:30
आठ हजार सलून चालकांचा रोजच्या जगण्याचा प्रश्न गंभीर
निखिल म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : टाळेबंदीमुळे अनेक छोट्या- मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात न्हावी समाजातील सलून व्यावसायिक आणि कारागिरांना दुकाने बंद असल्याने कामच उरले नाही. त्यामुळे आठ हजारांवर सलून दुकानदार व कारागिरांसमोर रोजच्या जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एकमेकांच्या संपर्कातून मोठ्या प्रमाणात होतो. त्यात सलूनच्या माध्यमातून याचा संसर्ग अधिक होण्याच्या संशयही आहे. टाळेबंदीत सलून बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात छोटी-मोठी आठ हजार दुकाने असून, त्यात १५ हजारांवर कारागीर कार्यरत आहेत. यात
काही मोठी दुकानेही व्यावसायिकांची असली तरी त्यात काम करणाऱ्या कारागिरांची संख्या ही जास्त आहे. मोठ्या सलूनमध्ये दोन ते पाच कारागीर कामावर असतात.
ज्यांचे पोट हे रोजच्या मिळकतीवर असते. मात्र, आता कामच उरले नसल्याने त्यांची परिस्थिती बेताची झाली आहे.अनेक सलून दुकाने ही भाड्याच्या जागेत आहेत. अनेकांचे ठेलेही भाड्याच्या जागेवर आहेत. यात ठेल्याचे भाडे ३ हजार ते मोठ्या दुकानांचे भाडे १० हजारांवर आहे. मात्र, लाॅकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने भाडे थकले आहे.
सलून कामगारांसाठी सरकारने घर भाड्यात सूट द्यावी, वसुलीची सक्ती करून नये, असे आवाहन केले आहे. मात्र घरमालक पैशासाठी विचारणा करीत असल्याने कामच नसल्याने भाडे द्यायचे कसे, अशा पेचात छोटे दुकानदार सापडले आहेत.
- समिर शिर्के
अनेक दुकानांमध्ये असलेले कारागीर हे बाहेर राज्यातील किंवा विदर्भाच्या विविध जिल्ह्यतून आलेले आहेत. यातील अनेकांकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना स्वस्त धान्याचा लाभही मिळत नाही. त्यामुळे अशा कारागिरांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली असून प्रशासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.
- सतीश शिंदे
एक तर मागील वर्षभर आमची दुकाने कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे बंद होती. तशीच यावर्षी सुद्धा दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आता संसार चालवायचा कसा, असा प्रश्न उभा राहिला आहे. आता तरी या लाॅकडाऊनमध्ये आमची दुकाने सुरू ठेवण्यास सूट मिळावी.
- नितीश म्हात्रे
अनेक न्हावी हे मिळेल त्या रिकाम्या जागेवर कच्चे दुकान, ठेला उभारून काम करतात. काही तर फुटपाथवर एक छोटी खुर्ची टाकून रोजच्या मिळकतीतून परिवाराचा गाडा चालवतात. मात्र, टाळेबंदीने कुणालाच काम नसल्याने विस्कटलेली परिस्थिती कशी सावरायची, असा प्रश्न पडला आहे.
- राजू जाधव ( उपाध्यक्ष,
नाभिक संघटना अलिबाग)