Coronavirus: लॉकडाऊन हा पर्याय नाही; नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा बडगा उगारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:42 PM2020-06-29T23:42:22+5:302020-06-29T23:42:51+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी आणि आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच अलिबागमधील व्यापारी, दुकानदार व्यावसायिक यांना सूचना देण्यात येतील.
रायगड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही. नागरिकांनीच कोरोनाचे गांभीर्य ओळखून नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोरोनासंबंधातील नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा कारवाईला तयार राहा, असा इशाराही ते द्यायला विसरले नाहीत.
रोहा, कर्जत, पेण, मुरुड आणि श्रीवर्धन शहरांमध्ये तीन दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अलिबाग या महत्त्वाच्या शहरात मात्र अनलॉक आहे. शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन प्रभावी उपाय नसल्याचे नाईक यांनी सांगितले. सरकारनेही लॉकडाऊन करण्याला विरोध केला आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही जिल्ह्यात लॉकडाऊन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील परिस्थित पाहून संबंधित स्वराज्य संस्था आवश्यक तो निर्णय घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार, संबंधित ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून निर्णय घेतले जात आहेत. सर्वत्रच कोरोनाचा वाढता संसर्ग सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे.
सध्या तालुक्यातील कोरोनाचा वाढता आकडा सर्वांचीच डोकेदुखी ठरली आहे. कोरोनाची चेन तोडण्याकरिता काही शहरांमध्ये तीन-चार दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे, तर काही शहर त्या दिशेने विचार करत आहेत. पेण, कर्जत, रोहा, मुरुड आणि श्रीवर्धन शहरांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने बाजारपेठ, तसेच दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. हे जरी खरे असले, तरी तेथील कोरोनाचा वाढता संसर्ग थांबलेला नाही, ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही, असे प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपासून सलून सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन करून त्यांचे अथवा अन्य व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यात ३४४९ कोरोनाबाधित
1) जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३४४९ वर गेली आहे. आतापर्यंत १२८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उरण तालुक्यात २५५, कर्जत १२८, अलिबाग ११५ आणि पेणमध्ये १०१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. अन्य तालुक्यांमधील हाच आकडा १०० च्या खाली आहे.
2) शहरांचा विचार केल्यास पेण, रोहा, कर्जत या शहरांमध्ये कोरोनाने कहर केलेला आहे. त्या तुलनेत अलिबागची परिस्थिती बरी आहे.
3) अलिबाग शहराला काही महत्त्वाच्या ग्रामपंचायती लागून आहेत. त्यांच्या हद्दीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका संभवतो, परंतु नागरिकांनीच खबरदारी घेतली पाहिजे. नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी आणि आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच अलिबागमधील व्यापारी, दुकानदार व्यावसायिक यांना सूचना देण्यात येतील. त्यांनी आपल्या येथील गर्दी कमी करून सामाजिक अंतर राखण्यासाठी, तसेच सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले.