CoronaVirus पनवेल महापालिकाच नाही तर संपूर्ण तालुकाच रेड झोन केला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 03:46 PM2020-05-05T15:46:20+5:302020-05-05T15:46:55+5:30
रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये येत आहे. मात्र, पनवेल पालिका क्षेत्र याआधी रेड झोनमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता पनवेल महानगरपालिका क्षेत्र व संपूर्ण पनवेल तालुका “रेड झोन” म्हणून घोषित केल्याचे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.
कोरोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 03 मे 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र आता लॉकडाऊन कालावधीतील हे मनाई आदेश यापुढेही दि.03 मे रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.17 मे रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत लागू करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या दि. 2 मे रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये येत आहे. मात्र, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता यापुढे रेड झोनबाबत शासनाने दिलेले सर्व निर्देश पनवेल महानगरपालिका क्षेत्र व संपूर्ण पनवेल तालुक्यासाठी लागू राहतील, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घोषित केले आहे.