पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पालिका प्रशासनाने मच्छी मार्केट सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोळी बांधवांनीही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पनवेलच्या कोळीवाड्यात पनवेल व पनवेलबाहेरून अनेक जण खरेदीसाठी येत असतात. यामुळे कोळीवाडा परिसरात नागरिकांची गर्दी होत असते. अनलॉकनंतरही ती जास्त झाल्याने पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोळीवाडा मच्छी मार्केट बंद करण्याबाबत निर्देश दिले.
यानुसार, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी सातत्याने कोळीवाडा मार्केट येथे अतिक्रमणविरोधी पथकाच्या माध्यमातून कारवाई केली. या बरोबर स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन, त्यांना पनवेल कोळीवाडा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तेथे जनजागृती केली. कोळीवाड्यातील पंच कमिटीची बैठक बोलावून त्यांना कोरोनाविषयी माहिती देऊन कोळीवाडा मच्छी मार्केटमध्मे मच्छी विक्रेते बसत असल्याने, त्या ठिकाणी मच्छी घेण्यासाठी शहरातील नागरिक व पनवेल शहराच्या आजूबाजूच्या खेडेगावातील नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याने गर्दी होते. यामुळे इथे संसर्ग पसरण्याची भीती असल्याचे येथील रहिवाशांना सांगितले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून तेथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सदरचे मच्छी मार्केट बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला. त्यानुसा आता हे मार्केट सात दिवस बंद असणार आहे.