Coronavirus: म्हसळा ग्रामीण रुग्णालयात ४० खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 11:19 PM2021-04-24T23:19:14+5:302021-04-24T23:19:32+5:30
आदिती तटकरेंकडून रुग्णालयाची पाहणी
म्हसळा : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रभाव व रुग्णांना मिळणाऱ्या बेडचा अभाव पाहता प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. याच हेतूने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात ४० खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय तयार होणार आहे.
शनिवारी पालकमंत्री आदिती तटकरे या म्हसळा दौऱ्यावर आल्या होत्या; तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी ग्रामीण रुग्णालयाची पाहणीदेखील केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केद्र जुन्या पंचायत समिती कार्यालयात, कोविड लसीकरण केंद्र, पाभरा फाटा येथील फ्लू क्लिनिकच्या जागेत; तर ग्रामीण रुग्णालयाची सामान्य ओपीडी सद्य:स्थितीत आहे त्याच जागेवर राहणार असल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार शरद गोसावी, म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नाजीम हासवारे, राष्ट्रवादी म्हसळा तालुकाध्यक्ष समीर बनकर, माजी नगराध्यक्ष जायेश्री कापरे, उपनगराध्यक्ष संजय कर्णिक, शोएब हळदे, एपीआय सुर्वे, डॉक्टर महेश मेहता, अलंकार करंबे, सोनल करंबे उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणीनंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी शहरातील अल हम्द रुग्णालयाचीही पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन तंत्रज्ञाअभावी बंद असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. पालकमंत्री ग्रामीण रुग्णालयाच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी तीन दिवसांत मशीन तंत्रज्ञ मिळून उपलब्ध करून देऊ व एक्स-रे मशीन सुरू करा असे आदेश दिले.