CoronaVirus News: कर्जतमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:36 PM2020-06-15T23:36:00+5:302020-06-15T23:36:08+5:30
पोशिर येथील तरुणाचा मृत्यू
कर्जत : तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण थांबत नाही असे दिसून येत आहे. कर्जत शहरात एका महिलेचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पोशिर गावातील ३९ वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी घेतला आहे. कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४६ झाली असून त्यात पाच जणांचे बळी गेले आहेत. १६ जणांवर उपचार सुरू आहेत तर २५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सावळे गावातील मारामारीप्रकरणी अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात आल्याने ३२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल १५ जून रोजी पॉझिटिव्ह आला आहे. आरोपी तरुणामुळे कर्जत शहरात दोन पोलीस कर्मचारी, एक पोलीस अधिकारी आणि एका पोलिसाची पत्नी अशा चार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कर्जत डेक्कन जिमखाना, ज्ञानदीप सोसायटी आणि डी मार्ट परिसर हे कंटेनमेंट झोन बनले आहेत. या रुग्णामुळे कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. त्यात कर्जत तालुक्यातील कर्जत, माथेरान, नेरळ या शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील गावात कोरोना पोहोचला आहे.
पोशिर येथील ३९ वर्षीय तरुणाचा सोमवारी मृत्यू झाला असून नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीत नोकरी करणाºया तरुणाला मित्राकडून लागण झाली होती. त्याच्या टेस्टचे अहवाल १३ जून रोजी रात्री पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर अल्पावधीत पोशिर गावातील तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या पश्चात आईवडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार असून एकुलता एक आणि कर्ता मुलगा गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
उरणमध्ये १६६ रु ग्ण ठणठणीत; घरी परतले
उरण : उरणमधून कोरोनाबाधित १८२ रुग्णांपैकी आजपर्यंत १६६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित १५ पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उरण परिसरात आजतागायत ४३३ नागरिकांच्या केलेल्या चाचणीतून १८२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यापैकी १६६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले.