रायगड - जिल्ह्यातील हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून पुरवण्यात आलेली रेमडेसिवीर इंजेक्शन मागे घेण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. संबंधीत कंपनीच्या विनंतीवरुनच हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 28 आणि 29 एप्रिल रोजी विविध ठिकाणच्या 90 जणांना या इंजेक्शनमुळे त्रास झाल्याच्या तक्रारी आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी लोकमतशी बोलताना दिली.
काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला होता. त्यामुळे सरकारने याबाबत एक निश्चित धोरण आखले. जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे यावर थेट नियंत्रण आणले. त्यामुळे खासगी औषधाच्या दुकानात रेमडेसिवीरच्या विक्रीवर बंधणे आली. जिल्ह्यासाठी ठराविक पुरवठादार यांची नियुक्ती करुन त्यांच्या मार्फतच नोंदणी केलेल्या रुग्णालयांना याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे काळाबाजारावर नियंत्रण आलेच शिवाय काही खासगी डॉक्टर हेच इंजेक्शन अव्वाच्या सव्वा किंमतीमध्ये रुग्णांना देत असल्याने तक्रारी वाढल्या होत्या. त्यावर नियंत्रण आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
28 एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडूनसुमारे 510 रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यात आले होते. पैकी 310 इंजेक्शन जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांना देण्यात आले होते. 29 एप्रिल रोजी तेथील रुग्णांना सदरचे इंजेक्शन टोचण्यात आल्याने सुमारे 90 रुग्णांना काही प्रमाणात त्रास झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यानंतर काही तांत्रिक कारणाने कंपनीने कोविकोफर नावाच्या बॅच नंबर एचसीएल 21013 इंजेक्शनचा वापर थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर पेण येथील रायगडच्या सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत, असेही मठपती यांनी सांगितले. कोणत्या रुग्णालयातील रुग्णांना या इंजेक्शनचा त्रास झाला याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.