CoronaVirus News: नियमांना फाटा दिल्याने नागोठण्यात रूग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:50 AM2021-04-04T00:50:11+5:302021-04-04T00:50:26+5:30
एकाच दिवशी १८ रुग्ण : बाधितांची एकूण संख्या पोहोचली ३७ वर
नागोठणे : गेल्या चोवीस तासात शहरासह विभागात कोरोनाचे १८ रुग्ण वाढले आहेत. नागरिक कोरोनाच्या नियमांचे अद्यापही पालन करीत नसल्यामुळे रुग्ण वाढण्याची भीती असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी केले आहे.
१ एप्रिलपर्यंत शहरात फक्त १९ रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, २ एप्रिलच्या सकाळपासून रुग्णाची संख्या प्रचंड संख्येने वाढण्यास सुरुवात झाली असून आज ३ एप्रिलच्या सकाळपर्यंत चोवीस तासात १८ रुग्ण वाढले आहेत. यात नागोठणेतील सहा, वरवठणेत नऊ आणि कानसई येथील तीन रुग्ण आहेत व त्यात एका तीन महिन्यांच्या बालिकेचा समावेश आहे. या ३७ रुग्णांपैकी बारा जण घरी परतले आहेत. तर कोविड सेंटरमध्ये २० आणि तिघे जण त्यांच्या घरीच विलगीकरण झाले आहेत. कोविड सेंटरमधील एका रुग्णाची तब्येत ढासळल्याने त्याला अलिबागच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर नागोठणेतील एक बाधित व्यक्ती मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे डॉ. चेतन म्हात्रे यांनी सांगितले. शहरात मुंबई-गोवा महामार्गावर भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे वरिष्ठांच्या आदेशानुसार हा पेट्रोल पंप दोन दिवस बंद करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत ६०६ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याबाबतचा अध्यादेश आला नसल्याने ६० वर्षांवरील नागरिकांनाच आठवड्यातून तीन दिवस लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले.
मुरुडमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्ली-मांडला : राज्यात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन रुग्णसंख्या वाढत असून आज मुरुडमध्ये तीन रुग्ण आढळून आले असल्याने रुग्णसंख्या पंधरावर गेली असून त्यातील एक जण बरा झाला असून चौदा जण पाॅझिटिव्ह आहेत.
शहरातील तसेच तालुक्यातील गर्दीच्या ठिकाणी दुकाने, बँका, बाजारपेठा, आठवडे बाजार, शासकीय कार्यालये या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये. राज्यात मुंबई, पनवेल, पुणे अन्य ठिकाणी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने निर्बंध कडक केले आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर व सोशल डिस्टंन्स पाळून नियमांचे पालन करावे.
राज्यातील तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने लाॅकडाऊनचे सावट असून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही आणि ठरावीक निर्बंधांचे पालन करून सर्व व्यवहार सुरळीत ठेवूनही सुरक्षितता जोपासता येईल. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे, मास्क वापरावे, हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझर वापरावे. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो बाहेर जाणे टाळावे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव व राज्यातील लाॅकडाऊन टाळण्यासाठी शासनाच्या अटीशर्ती व नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार गमन गावित यांनी केले आहे.