उरण : सिडकोच्या माध्यमातून उरणमध्येच बोकडविरा येथील सिडकोच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये येत्या आठवडाभरात डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर सुरू होणार आहे. यामुळे येथील कोविड रुग्णांवर उरणमध्येच उपचार करणे शक्य होणार असल्याची माहिती सिडकोचे सीएचओ डॉ.बी.एस.बावीसकर यांनी दिली.
उरणमधील कोवीड रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबई व मुंबई येथे जावे लागते. अनेक वेळा तर कोविड रुग्णांसाठी नवी मुंबई व मुंबई येथेही बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे उपचाराअभावी अनेक रुग्णांवर दुर्दैवाने प्राण गमावण्याची पाळी आली. कोरोनाचे संकट आणि त्याच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरणकरांसाठी उरणमध्येच उपचार होणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे उरणमध्येच सर्व सोईसुविधांसह कोविड सेंटर उभारण्यात यावे, यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्याकडून शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सिडको, जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने मनोहर भोईर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मनोहर भोईर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.उरणमध्येच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सोय उपलब्ध करून देण्याबाबत सोमवारी (२) जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीस रायगड सिव्हिल सर्जन सुहास माने, रायगड डीएचओ सुधाकर मोरे, सिडकोचे सीएचओ डॉ.बी.एस.बावीसकर, उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज भद्रे, उरण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विकास मोरे, उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, माजी आमदार मनोहर भोईर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य विभागाकडून विविध नेमणुका५० बेडच्या या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे, तसेच जिल्हा आरोग्य विभागाकडून फिजिशियन, इंटेन्ससिव्हिक अशा नेमणुकाही करण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची तातडीने तरतूद करण्यात आली असून, हे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथल्या आठवडाभरात सुरू होणार असल्याची माहिती डॉ.बी.एस.बावीसकर यांनी दिली.
शहरवासीयांना दिलासाया बैठकीत उरणमधील कोविड रुग्णांसाठी बोकडविरा येथील सिडकोच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये लवकरच उरणमध्ये सिडकोच्या माध्यमातून आयसीयू व्यवस्था वगळता डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सिडकोचे सीएचओ डॉ.बी.एस.बावीसकर यांनी दिली. त्यामुळे उरणकरांना दिलासा मिळणार आहे.