CoronaVirus News: नागरिकांच्या प्रतिकारशक्तीने कोरोनाशी लढा ठरतोय प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:04 AM2020-10-09T00:04:01+5:302020-10-09T00:04:14+5:30
कोरोना रुग्णसंख्येत घट; मृतांचा आकडा काळजाचा ठोका चुकवतोय
- आविष्कार देसाई
रायगड : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये कमालीची घट होताना दिसत आहे. नागरिकांच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसत असली तरी मृतांचा आकडा हा तीन टक्केच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
जुलै आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लाट अधिक प्रखर होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. त्यानुसार कोरोनाचा कहर आपल्याला सर्वत्र दिसून आला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ८ मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता. मा$र्च महिन्यामध्ये देशभर लॉकडाऊन जाहीर झाला होता. पुढे तो सोयीनुसार वाढविण्यात आला होता. सर्वत्रच व्यवहार ठप्प असल्याने कामगार, शेतकरी, मजूर, छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर आता पुन्हा सर्व व्यवहार सुरळतीपणे सुरू करण्यात आले आहेत.
रुग्णसंख्येत होणारी वाढ आता कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील आकडा सुमारे ७०० पर्यंत गेला होता. आता तोच आकडा ३५०च्या आसपास आहे. नागरिकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचाच हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र विविध आजार असणाऱ्यांना मृत्यू कवटाळत आहे. हे चित्र सर्वांचीच चिंता वाढवणारे आहे.
खासगी रुग्णालयांकडून आर्थिक लूट सुरू
खासगी रुग्णालये रुग्णांकडून लाखोंची बिले उकळतात. सरकारने लेखापरीक्षण समिती स्थापन केली. मात्र त्या समितीनेही खासगी रुग्णालयांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी तक्रार केल्यावर जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश काढले होते.
नागरिकांंमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे ते सर्वांच्याच फायद्याचे ठरत आहे.
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये
8% ० ते 17 वर्ष वयोगट
10% 18 ते 25 वर्ष वयोगट
42% 26 ते 44 वर्ष वयोगट
41% 45 ते 60 पेक्षा जास्त वयोगट
3525 दररोज रुग्णांची तपासणी