CoronaVirus News : रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल, बाहेर नातेवाईक बेहाल, रायगडमध्ये कोविड केअर सेंटरमध्ये प्राथमिक सोईसुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 12:03 AM2021-04-14T00:03:09+5:302021-04-14T00:03:51+5:30
CoronaVirus News : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. परंतु त्यांच्यासोबत नातेवाइकांचेही हाल होत आहेत.
- निखिल म्हात्रे
अलिबाग : मागील २० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढल्याने रुग्णांना आरोग्य सेवा द्यायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याने अलिबाग येथील जिजामाता कोविड केअर सेंटर सुरू केले. मात्र येथे पिण्याच्या पाण्यासह इतर प्राथमिक सोईसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. परंतु त्यांच्यासोबत नातेवाइकांचेही हाल होत आहेत. बाहेर त्यांना कुणीच मदत करायला तयार नाही. ‘दूर राहा, दूर राहा’ फक्त एवढेच ऐकायला येत आहे. रुग्णांसोबत आलेल्या इतर नातेवाइकांची जेवणाची सोय नसल्याने त्यांना उपाशी राहावे लागते. चहा, पाणी व नाश्ता मिळणे कठीण झाले आहे. जिल्हा रुग्णालयात एका बाजूला आयसोलेशन वाॅर्ड तर याच रुग्णालयाच्या दुसऱ्या वॉर्डात इतर आजारांचे रुग्ण असल्याने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाइकांना वॉर्डाच्या बाहेर राहावे लागत आहे. यामुळे रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाइकांना रात्र जागून काढावी लागत आहे. खाण्या-पिण्यासाठी खिशात पैसे असले तरी बाहेर एकही दुकान नाही.
नातेवाइकांकडे जाता येत नाही आणि बाहेर काही मिळत नाही
रुग्ण ॲडमिट असेल तर त्याचे नातेवाईक केंद्राच्या बाहेर असतात. रुग्णांना काही गरज भासेल म्हणून ते तेथेच थांबतात. परंतु, त्यांची मोठी अडचण होत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांच्या काळजीपोटी ना ते घरी जाऊ शकत, ना ब्रेक द चेनमुळे त्यांना कोणतेही साहित्य मिळत. त्यामुळे रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांचे मोठे हाल होत आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयात आम्ही आमच्या रुग्णाच्या उपचारासाठी आलोय. आतमध्ये आमच्या रुग्णाकडे कुणी लक्ष देत नाही तर बाहेर आम्हालाही त्रास होतोय. खिशात पैसे असूनही भूक शमविता येत नाही. कोरोनाच्या दहशतीने दुकाने बंद आहेत. खर्च करण्याची मानसिकता असली तरी एकही दुकान सुरू नाही.
- रुग्णाचा नातेवाईक
माझा मोठा भाऊ रुग्णालयात आहे. त्याची तब्येत कशी आहे, हे सांगणारे इथे कुणीच नाही. त्याला जेवण वेळेवर मिळते की नाही, हेसुद्धा कळत नाही. त्यामुळे व्हिडीओ काॅलद्वारे रुग्णाला दाखविण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी.
- रुग्णाचा भाऊ
कोरोनामुळे परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की कसल्याही आजाराचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये जाण्यास निघत नाही. हॉस्पिटलमध्ये गेल्यास परत घरी जाणार की नाही, असे रुग्णांना वाटते. रुग्णांच्या सोबत हिंमत करून आलेल्या त्यांच्या नातेवाइकांनाही त्रास सहन करावा लागतो. रुग्णालयाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी त्रासच आहे.
- रुग्णाचा नातेवाईक