CoronaVirus News : महिलांपेक्षा पुरुषांचा कोरोनाने मृत्यू, जिल्हा प्रशासनाचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:29 PM2020-09-14T23:29:12+5:302020-09-14T23:29:30+5:30
० ते १७ वयोगटांतील ८ टक्के नागरिक हे कोरोनानेबाधित होत आहेत, तर २६ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोनाचा घट्ट विळखा पडत आहे.
- आविष्कार देसाई
रायगड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत पुरुषांची कोरोना चाचणीची संख्या महिलांच्या तुलनेत अधिक करण्यात आली आहे. त्यातील ७२ टक्के पुरुषांचा तर २८ टक्के महिलांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
० ते १७ वयोगटांतील ८ टक्के नागरिक हे कोरोनानेबाधित होत आहेत, तर २६ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोनाचा घट्ट विळखा पडत आहे. ६० पेक्षा अधिक वयोगटांतील १२ टक्के नागरिक कोरोनाने त्रस्त आहेत. त्यातील ४९ टक्के नागरिकांना मृत्यूने कवटाळले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने शहरी भागातून आपले हातपाय ग्रामीण भागाकडे पसरवले आहेत. ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांचे जाळे असल्याने, या ठिकाणी जास्त प्रमाणात वर्दळ सुरू आहे. अनलॉकनंतर त्यामध्ये अधिक भर पडली आहे. पुरुष हे कामानिमित्त मोठ्या संख्येने बाहेर पडतात. ६५ टक्के पुरुषांची तर ३५ टक्के महिलांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये दोन्ही घटकांना १०० टक्के कोरोना झाल्याचे दिसून येते. प्रशासनाने एक लाख १६ हजार ६३७ कोरोना चाचणीचा अभ्यास केला आहे. त्यानुसार, ही आकडेवारी आहे.
६५ टक्क्यांपैकी ६६ टक्के पुरुषांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले, ३४ टक्के रुग्णांनी घरीच उपचार केले अथवा त्यांना त्रास झाला नसावा. ३५ टक्के महिलांपैकी तर ३४ टक्के महिलांनी रुग्णालयात उपचारास पसंती दिली. येथेही ६६ महिलांना लक्षणे नसावीत, अथवा त्या घरीत बऱ्या झाल्या असण्याची शक्यता आहे. ६६ पैकी ७२ टक्के पुरुष रुग्णांचा, ३४ पैकी २८ टक्के महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
० ते १७ वयोगटांतील ९९ टक्के रु ग्ण झाले बरे
- ० ते १७ वयोगटांतील ७ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, कोरोना होण्याचे प्रमाण हे ८ टक्के आले, तर ९२ टक्के नागरिकांना कोरोना नसल्याचे सिद्ध झाले. ७ टक्के कोरोनाबाधितांना रुग्णालयात उपचासाठी दाखल केले असता, ९९ टक्के रुग्ण बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत, तर १ टक्का रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
- १८ ते २५ वयोगटांतील १२ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, १० टक्के नागरिकांना कोरोना झाल्याचे दिसून येते, तर ९० टक्के रिपोर्ट निगेटिव्ह आले. १० टक्क्यांपैकी पैकी ९ टक्के कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल केले असता, ९९ रुग्ण बरे झाले तर, १ टक्का मृतांचे प्रमाण आहे.
- २६ ते ४४ वयोगटांतील ४७ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ४२ टक्के नागरिक कोरोनाबधित आढळले, तर ५८ नागरिकांचे रिपोर्ट नगेटिव्ह आले. ४२ पैकी ३९ टक्के नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर ६१ नागरिकांना दाखल केले नाही. उपचारानंतर ३८ टक्के नागरिकांना मृत्यूने कवटाळले, ६२ रुग्ण बरे झाले.
- ४५ ते ६० वयोगटांतील २५ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. २८ टक्के नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, तर ७२ रिपोर्ट निगेटिव्ह आले. २९ टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले असता, मृत होण्याचे प्रमाण ३८ टक्के, बरे होण्याचे प्रमाण हे ६२ टक्के आहे.
- ६० टक्के आणि त्याच्या पुढील वयोगटांतील ९ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, १२ टक्के नागरिकांची कोराना चाचणी पॉझिटिव्ह आली, तर ८८ नागरिकांची निगेटिव्ह आली. पैकी १५ टक्के नागरिकांना रुग्णालयात दाखल केले असता, तब्बल ४९ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.