CoronaVirus News: गणेशोत्सवासाठी कोरोना योद्धे सज्ज; गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:52 PM2020-08-12T23:52:33+5:302020-08-12T23:52:46+5:30
अलिबाग नगरपरिषद, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणेची तयारी
- निखिल म्हात्रे
अलिबाग : अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असली, तरी गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना योद्धे सज्ज झाले आहेत. लाडक्या बाप्पांच्या विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी गणरायांच्या विसर्जनाचे नियोजन तयार करण्यात आले आहे. अलिबाग नगरपरिषद, अलिबाग महसूल प्रशासन आणि अलिबाग पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशीच विसर्जनासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
समुद्रकिनारी बाप्पाची मूर्ती प्रशासनाच्या हवाली करून गणेशभक्तांना माघारी फिरावे लागणार असून, गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची जबाबदारी अलिबाग नगरपरिषद कर्मचारी आणि लाइफ गार्ड यांच्या खांद्यावर देण्यात येणार आहे. यंदाचा गणेशोत्सव हा कोरोना महामारीच्या कचाट्यात सापडला आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनानेच आदर्श नियमावली जारी केली आहे. यामध्ये घरगुती गणेशमूर्ती २ फूट आणि सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट उंचीची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. गणेश विसर्जनासाठी अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ, अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी महेश चौधरी आणि अलिबाग पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांनी लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून नियोजन केले आहे.
अलिबाग शहर आणि परिसरातून विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचे अलिबाग पोस्ट कार्यालयाच्या नजीक रस्त्यावर स्क्रीनिंग केले जाणार आहे. स्क्रीनिंग केल्यानंतर घरगुती गणेशासोबत २ जण आणि खासगी गणेशासोबत ५ गणेशभक्तांना तपासणीनंतर विसर्जनाच्या मार्गावर जाण्याची मुभा देण्यात येणार आहे. क्रीडाभवनच्या समुद्र किनाºयालगतच्या कॉर्नरवर दुसरा तपासणी नाका असणार आहे अशी माहिती अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
घरपोच गणेश विसर्जन सेवसेसाठी चर्चा सुरू
क्रीडाभवनच्या कॉर्नरला निर्माल्य जमा करणाºया चार काउंटर ठेवण्यात येणार आहेत. गणेश विसर्जनासाठीही चार काउंटर उभारण्यात येणार आहेत. गणेशमूर्तीची बैठक व्यवस्था आणि रेती तेथेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.
गणेशाचे विसर्जन करण्याची जबाबदारी अलिबाग नगरपरिषद कर्मचारी आणि लाइफ गार्ड यांच्यावर असणार आहे. हातगाडीने किनाºयापर्यंत आणि तेथून बोटीने समुद्रात नेऊन गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
गणेशभक्तांनी विसर्जनापूर्वीची महाआरती घरून करून यावे. ज्यांना गणेश विसर्जन करण्यासाठी घरपोच सेवा आवश्यक असणार आहे, त्या नागरिकांनी मागणी केली तर घरपोच गणेश विसर्जन सेवा पुरविण्याचे नियोजन करत येईल का, अशी चर्चा सुरू असल्याचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले.
एकदिशा मार्गाचे नियोजन-कोल्हे
गणेश विसर्जन करण्यासाठी मिरवणूक काढण्यावर बंधने आणण्यात आली आहेत. यामुळे गर्दी न करता गणेशभक्तांना समुद्रकिनाºयावर विसर्जन करण्यासाठी येताना प्रशासनाला सहकार्य करावे लागणार आहे. गणेशभक्त अलिबाग शहरातून थेट किनाºयाच्या दिशेने येतील, यासाठी एकदिशा मार्ग नियोजित करण्यात येणार आहे. अंतिम टप्प्यात गणेशभक्तांनी गणेश विसर्जन करण्यासाठी मूर्ती सुपुर्द केल्यानंतर, एकदिशा मार्गानेच बाहेर पडावे, असे आवाहन अलिबाग पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांनी केले आहे.