CoronaVirus News: रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट; आकडेवारीवरून स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:49 AM2020-10-08T00:49:37+5:302020-10-08T00:49:48+5:30
CoronaVirus Raigad News: सरासरी ५५ पर्यंत रुग्ण मिळण्याचे प्रमाण खाली
अलिबाग : रायगड जिल्ह्यात जुलैनंतर सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याने अचानक उसळी मारली होती. त्यानंतर, कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी सरकारसह जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कमी होत असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. त्या दरम्यान, दररोज १० ते १५ जणांचा मृत्यू होत होता. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे चिंतेची बाब ठरली होती. जिल्ह्यात दररोज ७०० पर्यंत जाणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३०० ते ३५० वर येऊन थांबली आहे. गेल्या पाच दिवसांत १ हजार ७०४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, तर २ हजार १९७ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सरासरी ५५ पर्यंत रुग्ण मिळण्याचे प्रमाण खाली आले आहे. त्यामुळे आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता मंदावत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केलेल्या उपाय-योजनांमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे.
प्रादुर्भाव काही प्रमाणात स्थिरावला : मागील १५ दिवसांपासून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव काही प्रमाणात स्थिरावला आहे. त्यामुळे नागरिकांसह सेवेस तत्पर असणाºया वैद्यकीय अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, मृत्युदर अजूनही ३ टक्क्यांपेक्षा कमी आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना स्वत:ची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
आरोग्याविषयी नागरिक सजग-जिल्हाधिकारी : स्वत:च्या आरोग्याविषयी आता नागरिकही सजग झाले आहेत. सरकारच्या ‘माझे कुटुंंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमचे कर्मचारी गावागावांमध्ये जाऊन नागरिकांची माहिती घेत आहेत. कुणा नागरिकास सर्दी, ताप, खोकला असेल, तर त्या कुटुंबाची माहिती आरोग्य विभागाला देऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. वेळीच औषधोपचार मिळाल्याने आता कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.