CoronaVirus News : रुग्णसंख्या कमी झाल्याने ऑक्सिजनची मागणी घटली, जिल्ह्यात ४८ काेविड सेंटर झाले बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 12:53 AM2020-11-04T00:53:04+5:302020-11-04T00:53:39+5:30
CoronaVirus News: जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत वाढलेल्या रुग्णसंख्येत कमालीची घट हाेत आहे. सरकार आणि प्रशासनाने वेळाेवेळी केलेल्या उपाय याेजनांमुळे हे शक्य झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
- आविष्कार देसाई
रायगड : दिवाळी सणाच्या ताेंडावरच जिल्ह्यातील काेराेना रुग्ण संख्येत कमालीची घट हाेताना दिसत आहे. त्यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजनच्या मागणीतही उल्लेखनीय घसरण झाली आहे. रुग्ण संख्येत घट झाल्याने तब्बल ४८ काेविड सेंटर बंद केली आहेत, तर सध्या सुरू असलेल्या २१ काेविड सेंटरपैकी सहा ठिकाणीच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत वाढलेल्या रुग्णसंख्येत कमालीची घट हाेत आहे. सरकार आणि प्रशासनाने वेळाेवेळी केलेल्या उपाय याेजनांमुळे हे शक्य झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. खालापूर, तळा, सुधागड, श्रीवर्धन आणि पाेलादपूरमध्ये रुग्ण संख्या शून्यावर आली आहे, तसेच उरण, खालापूर, कर्जत, पेण, अलिबाग, मुरुड, माणगाव, राेहा, म्हसळा आणि महाड या तालुक्यातील रुग्णसंख्या एक आकडी झाली आहे. आतापर्यंत दाेन लाख तीन हजार ३९ नागरिकांची काेराेना चाचणी करण्यात आली आहे. पैकी ५४ हजार २१७ काेराेनाचे रुग्ण आढळले आहेत. ५१ हजार ३८२ रुग्णांनी काेरोनावर मात केली आहे. एक हजार ५५७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या एक हजार २७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सदरची आकडेवारी २ नाेव्हेंबरपर्यंतची आहे.
जिल्हा सरकारी रुग्णालयात प्लान्ट
सुरुवातीला खालापूर तालुक्यातील खासगी कंपनीमार्फत ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. वेळ आणि पैसा खर्च हाेत असल्याने स्वतंत्र ऑक्सिजन प्लान्टची संकल्पना पुढे आली. त्यानुसार, अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालय परिसरात ऑक्सिजन प्लान्ट उभारला. त्यातूनच ८० ऑक्सिजन, आयसीयू बेडला आता पुरवठा सुरू आहे.