CoronaVirus News: उरणमधील शासकीय, खासगी रुग्णालये हाऊसफुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:44 AM2021-04-05T01:44:12+5:302021-04-05T01:44:28+5:30

कोरोना रुग्णांची संख्या वाढली, उपचारासाठी अक्षम्य टाळाटाळ

CoronaVirus News: Government and private hospitals in Uran are full | CoronaVirus News: उरणमधील शासकीय, खासगी रुग्णालये हाऊसफुल

CoronaVirus News: उरणमधील शासकीय, खासगी रुग्णालये हाऊसफुल

Next

- मधुकर ठाकूर

उरण :  नागरिकांची बेपर्वाई, सण, समारंभात शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून होणारी गर्दी आणि कोरोनाची लक्षणे आढळून येत असतानाही फक्त भीतीमुळे रुग्णांकडून उपचारासाठी होत असलेली अक्षम्य टाळाटाळ, यामुळे उरणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमुळे सरकारी अथवा खासगी रुग्णालयात रुग्णांना बेडही उपलब्ध राहिलेले नाहीत. कोरोनाच्या उसळीमुळे मात्र उरणमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत आणि जिल्ह्यातील तालुक्यामध्ये वाढतच चालला आहे. त्याला उरण तालुकाही अपवाद राहिलेला नाही. घरामध्ये अडकून पडलेले नागरिक नुकतेच बाहेर पडू लागले आहेत. मात्र, बाहेर पडताना आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले निर्देश पाळले जात नाहीत. यामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. उरण तालुक्यामध्ये सकाळ-संध्याकाळच्या वेळेस नाक्या नाक्यावर, बाजारात अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. उरणमध्ये कुणालाच कोरोना विषाणूची भीती नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळल्यामुळे रुग्ण संख्येत भर पडत चालली आहे.

यामध्ये नोकरदार वर्ग आणि परप्रांतीय मजुरांची संख्या जास्त आहे. उरण शहराचा भाग असणाऱ्या चारफाटा या ठिकाणी दररोज सकाळी शेकडो परप्रांतीय मजूर रोजंदारीसाठी गर्दी करून असतात. यावेळी कोणतेही सोशल डिस्टन्सिंग अथवा मास्कचा वापर केला जात नाही. तर येथील रिक्षा आणि खासगी वाहतूक सेवादेखील कोणतेही नियम पाळत नसून, क्षमतेपेक्षा प्रवासी वाहतूक करून कोरोनाला आमंत्रण देत आहेत. त्यातच कोरोनाची लक्षणे आढळून येत असतानाही केवळ गैरसमज आणि भीतीमुळे उपचारासाठी रुग्णालयात जात नाहीत. कोरोनाची टेस्ट करून घेण्यासही धजावत नाहीत. असे संशयित रुग्ण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याऐवजी कोरोना स्पेडर बॉम्ब ठरू लागले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली शासकीय यंत्रणा प्रत्यक्षात कोणतेही ठोस काम करीत नाहीत.

वाढत्या रुग्णांमुळे आज सरकारी अथवा खासगी रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध राहिलेले नाहीत. ही बाब उरणकरांसाठी निश्चितपणे चिंताजनक आहे. यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रविवारी जीटीपीएस कॉलनी येथे जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता पकंज नागदेवता यांच्या सहकार्याने जनजागृती करण्यात आली. शहर अथवा ग्रामीण भागात कोरोनासदृश कोणतेही लक्षणे कोणत्याही व्यक्तीला जाणवली तर अशा व्यक्तीने तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे.
    - संतोष पवार, कोरोना समन्वयक उरण

Web Title: CoronaVirus News: Government and private hospitals in Uran are full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.