CoronaVirus News: यंदा गोविंदांचा ढाक्कुमाकुम नाहीच...; कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:14 AM2020-08-13T00:14:23+5:302020-08-13T00:14:33+5:30
मंदिरातही शुकशुकाट; नियमांचे काटेकोर पालन
‘शोर मच गया शोर देखो, आया माखन चोर’, ‘एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरे हुश्शार’, ‘गोविंदा रे गोपाळा’ अशी स्पीकरवर वाजणारी एकाहून एक सरस हिंदी, मराठी गीते आणि डीजेच्या तालावर थिरकणारी पावले, काळजात धडकी भरायला लावणारे गोविदांचे थर या वर्षी कोरोना विषाणूच्या सावटामुळे पाहायला मिळाले नाहीत. चार ते पाच माणसे एकत्र येऊन घरच्या घरी दहीहंडी फोडली गेली.
अलिबाग : मंगळवारी रात्री उशिरा श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये या निमित्ताने भजन, कीर्तन, पूजापाठही झाले नाहीत. मंदिरातील पुजाºयाने फक्त पूजा करून देऊळ पुन्हा बंद केले होते, तर प्रत्येकाने प्रसाद म्हणून सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. कोकणामध्ये दहीहंडी उत्सवामध्ये सोंग काढण्याची परंपरा बºयाच वर्षांपासून सुरू आहे. अलिबाग कोळीवाडा परिसरातून आजही पौराणिक, ऐतिहासिक, तसेच सद्य:स्थितीवर भाष्य करणारी सोंगे काढली जायची. मात्र, या वर्षी गोपाळकाला उत्सवावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने, अनेक वर्षांची परंपरा थांबली होती.
रायगड जिल्ह्यात नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी दहीहंडी रद्द करावी, अशी ग्रामपंचायतींच्या वतीने गावागावात दवंडी पिटविण्यात आली होती. याला गावकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यातील ७०० हून अधिक दहीहंडी रद्द झाल्या होत्या, तसेच गोपाळकालाच्या दिवशी निघणाºया मिरवणुकाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वर्षीच्या गोपाळकाला सण आगदी साधेपणात साजरा झाला, तर दुसरीकडे गावागावातील तलावांमध्ये पोहण्यासाठी गोविंदांची गर्दी असायची. मात्र, या वर्षी गावातील तलाव विहिरींवरही भयाण शांतता अनुभवयास मिळाली.
नियमांचे काटेकोर पालन
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना जिल्ह्यात संचारबंदीचे पालन होण्यासाठी श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळ काला उत्सव शांततेत पार पडण्यासाठी ११ पोलीस अधिकारी, १८० पोलीस कर्मचारी, २५५ होमगार्ड, तर ३ आर.सी. प्लाटून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत, तसेच नागरिकांनी अगदी शांततेत उत्सव साजरा करावा, असे अवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या आवाहनाचे नागरिकांनी तंतोतंत पालन केल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.