CoronaVirus News : काेराेनामुळे माेलकरणींसाठी अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा कसा चालणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 12:07 AM2021-04-14T00:07:16+5:302021-04-14T00:07:40+5:30
CoronaVirus News : जिल्ह्याची रुग्ण संख्या तब्बल ८२ हजार ९१२ वर पाेहोचली आहे, त्यापैकी ७३ हजार २०३ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या साडेसात हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.
- आविष्कार देसाई
रायगड : काेराेनाच्या भीतीने अनेकांनी घरातील माेलकरणींना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या माेलकरणींना आपल्या कुटुंबांचा गाडा कसा ओढायचा, असा प्रश्न पडला आहे. सरकारने माेलकरीणीसारख्या असंघटित कामगारांसाठी काही तरी करावे, अशी मागणी हाेत आहे. काेराेनाच्या रुग्ण संख्येत दरराेज झपाट्याने वाढ हाेत आहे.
जिल्ह्याची रुग्ण संख्या तब्बल ८२ हजार ९१२ वर पाेहोचली आहे, त्यापैकी ७३ हजार २०३ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या साडेसात हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या दिवसाला किमान १ हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या चिंतेत भर पडली आहे. काही महिला या नाेकरी करतात. या महिला घरकामासाठी माेलकरीण ठेवतात. या माेलकरीण महिला एकाच वेळेला सुमारे पाच घरांमध्ये काम करतात. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाने या महिलांनाही कामावर येऊ नका असे, सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. राेजगार गेल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.
घर कसे चालवावे याची चिंता
माेलमजुरी हाच व्यवसाय आहे. चार ठिकाणी काम केल्यावर महिन्याकाठी काही रक्कम हातात पडते. त्यावरच कुटुंबाचा चरितार्थ सुरू असताे. काेराेनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे कामावर येऊ नका, असे गृहनिर्माण साेसायटीवाले सांगतात. हातचे काम गेल्याने काय खायचे? असा प्रश्न आहे.
एका घरातून मिळतात ७०० रुपये
कपडे-भांडी केल्यावर दीड हजार रुपये मिळतात. काही फक्त कपडे अथवा भांडी घासण्याचेच काम देतात. त्यासाठी ७०० रुपये पदरात पडतात. किमान तीन ते चार ठिकाणी काम मिळते. आता मात्र ठप्प झाले आहे.
अर्थकारणाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न पडला आहे. महागाईने सर्वच महाग झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक ओढाताण हाेत असताना आता तर हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळे कुटुंबाचे पाेट कसे भरायचे, असा प्रश्न आहे. सरकारने आमच्या सारख्या असंघटित कामगारांचा विचार करणे गरजेचे आहे.
- मनिषा पडीयार
तुम्ही चार ठिकाणी काम करायला जाता त्यामुळे काेराेनाचा फैलाव हाेऊ शकताे. तुम्ही कामावर येऊ नका, असे साेसायटीवाले सांगतात. त्यामुळे आमचा राेजगार हिरावला गेला आहे. आमच्यासह आमच्या कुटुंबाची काळजी असल्याने आम्ही काेराेनाचे नियम पाळताे. - वंदना म्हात्रे
सुरुवातीला चार-पाच घरातील काम करता यायचे. त्यामुळे महिन्याला चांगले पैसे मिळायचे; परंतु काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वच धास्तावले आहेत. आम्ही ज्या ठिकाणी काम करताे त्यांनीच सांगितले की, काही दिवस कामावर येऊ नका. काेराेनाचे संकट अजून किती दिवस राहणार, देव जाणे.
- सायली निगम