CoronaVirus News: "कोरोना संसर्गाने नव्हे, तर पीपीई किट घालूनच मरू"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 01:46 AM2021-04-05T01:46:33+5:302021-04-05T07:00:53+5:30

आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यथा; कोरोना योद्धांना होणाऱ्या त्रासाचे सत्य

CoronaVirus News medical staff facing many problems due to ppe kits | CoronaVirus News: "कोरोना संसर्गाने नव्हे, तर पीपीई किट घालूनच मरू"

CoronaVirus News: "कोरोना संसर्गाने नव्हे, तर पीपीई किट घालूनच मरू"

Next

- निखिल म्हात्रे

अलिबाग : कोरोना महामारीपासून रुग्णांना वाचविण्यासाठी कोरोना योद्धे आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत. मात्र, रुग्णसेवेला सुरूवात करताच त्यांचे संपूर्ण शरीर काही वेळातच घामाघूम होते तर काहींचा जीव गुदमरतो. काही परिचारिका, टेक्निशियन तर भोवळ येऊन खाली पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. 

मात्र, याची पर्वा न करता, तसेच कोणाकडे तक्रार न करता कोरोना योद्धे आपला निग्रह ढळू न देता संयमाने काम करत आहेत. हा त्रास त्यांना पीपीई किट घातल्यानंतर सुुरु होतो. सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता, कोरोना 
योद्धांना होणाऱ्या त्रासाचे हे सत्य समोर आले.

प्लास्टिक कोटेड पीपीई कीट घालून डॉक्टर, परिचारिका, टेक्निशियन, अन्य कर्मचारी जे कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत, त्यांना सलग ८ ते १० तास काम करावे लागते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यात हे पॅकबंद पीपीई किट घालावे लागते. त्यामुळे शरीर घामाघूम होते. अनेकांना शरिरातील पाणी कमी होणे, शुगर कमी होण्याचा त्रास होत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील बहुतांश डॉक्टर, परिचारिका यांनी पीपीई किट घालणे बंद केल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाने नव्हे तर आम्ही हे पीपीई कीट घालून मरू, असे म्हणत घाटीतील एका परिचारिकेने आपला संताप व्यक्त केला.

उन्हाळ्यात पीपीई किट घालणे अशक्य 
उन्हाळ्यात प्लस्टिकचे पीपीई कीट घालणे अशक्य आहे. दोन तासाने पीपीई कीट बदलण्यात यावे. परिचारिका कमी असल्याने एक परिचारिकाला सलग ८ ते १० तास ते पीपीई किट घालून काम करावे लागते, यामुळेच परिचारिका आजारी पडत आहेत.
    - परिचारिका

शरीरातील पाणी होते कमी
पीपीई किट घातल्यानंतर अर्ध्या ते एक तासाने संपूर्ण शरीर घामाने ओलेचिंब होते. शरीरातील पाणी व शुगरचे प्रमाण कमी झाल्यासारखे होते.     
    - सिव्हील हॉस्पिटल

चक्कर येऊन पडले
मागील वर्षी पहिल्यांदा पीपीई किट घातले ते चांगले होते. त्यामुळे जीव गुदमरत नव्हता. मात्र, सध्याच्या पीपीई किटने जीव गुदमरतो आहे. मागील महिन्यात मी पीपीई किट घातले व ३ तासानंतर चक्कर येऊन खाली पडले. यामुळे परिचारिका, आरोग्यसेविका, कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालणे बंद केले.    - परिचारिका

पीपीई कीटचा दर्जा चांगला
मागील वर्षी सुरुवातीला जे पीपीई किट आले व आताचे पीपीई किट यांच्या दर्जात मोठा फरक आहे. दिवसेंदिवस पीपीई किटची गुणवत्ता सुधारत आहे. कुठेही पीपीई किट लिकेज नसल्याने घाम येतो.    - डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: CoronaVirus News medical staff facing many problems due to ppe kits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.