CoronaVirus News: लहान मुलांसह तरुणांना कोरोनाची सर्वाधिक लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:24 AM2020-06-20T00:24:04+5:302020-06-20T00:24:16+5:30
४० वर्षांपर्यंतचे ५८ टक्के रुग्ण; पन्नाशीनंतर मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त : तरुणांना निष्काळजीपणा भोवतोय
- नामदेव मोरे
नवी मुंबई : पनवेल, उरण व नवी मुंबईमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांमध्ये लहान मुले व तरुणांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. ५८ टक्के रुग्ण १ ते ४० वर्षे वयोगटांतील आहेत. निष्काळजीपणामुळे तरुणांना कोरोना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ५० वर्षांनंतर मृत्यू होण्याची संख्या सर्वात जास्त असल्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्र हे सुनियोजित शहराचा भाग समजला जातो. नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका, पनवेल तालुका व उरण परिसराचा परिसर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा दावा, या परिसरातील प्रशासन व राजकीय नेते वारंवार करत असतात, परंतु या परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. १८ जूनपर्यंत या परिसरातील रुग्णांची संख्या ५,८५४ झाली आहे. आतापर्यंत २०२ जणांचा मृत्यू झाला आहे.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे, परंतु पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये मात्र तरुणांमध्येच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण रुग्णांपैकी ५८ टक्के रुग्णांचे वय ४० वर्षांपर्यंत असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. दहा वर्षांपर्यंतची २५२ मुले, ११ ते २० वर्षांपर्यंत ४३० रुग्ण, २१ ते २० वर्षांपर्यंतचे १,४१४ तरुण व ३१ ते ४० वर्षे वयोगटांतील १,३५१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ४१ ते ५० वर्षे वय असलेल्या १,११० जणांना लागण झाली आहे. एकूण रुग्णांपैकी ७७ टक्के रुग्णांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे.
आतापर्यंत ४० वर्षे वयोगटांतील ३६ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. एपीएमसीमधील २७ वर्षांच्या तरुण व्यापाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. ११ ते २० वयोगटांतील दोघांना मृत्यू झाला आहे. ५० वर्षांनंतरच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत ५१ ते ६० वयोगटांतील ६३ जणांचा, ६१ ते ७० वयोगटांतील ४२ जणांचा व ७१ ते ८० वयोगटांतील १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
८१ ते ९० वयोगटांतील ३४ जणांना लागण झाली असून, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांनी जास्त खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
एपीएमसीमध्ये खबरदारी
ज्येष्ठ नागरिकांमध्ये व विशेषत: मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांमध्ये मृत्यू होण्याची प्रमाण जास्त आहे. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्व व्यापारी संघटनांना पत्र दिले आहे.
ज्यांना गंभीर आजार आहेत, अशा ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मार्केटमध्ये येऊ नये, असे आवाहन करावे, असे सुचविले आहे. पोलिसांनीही ५० पेक्षा जास्त वय असणाºया कर्मचाºयांना कोरोनाच्या जबाबदारीमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
तरुणांनी काळजी घ्यावी
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात ४० वर्षे वयोगटांपर्यंत कोरोना होण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
नोकरी, व्यवसायानिमित्तही तरुणांना घराबाहेर पडावे लागत आहे. याशिवाय अनेक जण विनाकारणही घराबाहेर पडत असून, मास्क, सॅनेटायझरचा वापर करत नाहीत. यामुळेही तरुणांमध्ये कोरानाची लवकर लागण होत आहे.
पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वयोगटाप्रमाणे रुग्णांचा तपशील
वयोगट रुग्ण मृत्यू
० ते १० २५२ ०
११ ते २० ४३० २
२१ ते ३० १४१४ ११
३१ ते ४० १३५१ २३
४१ ते ५० १११० ३८
५१ ते ६० ८३३ ६३
६१ ते ७० ३२५ ४२
८१ ते ८० १०५ १६
८१ ते ९० ३४ ७