CoronaVirus News in Raigad : रायगड जिल्ह्यात उभारले १२ स्वॅब टेस्टिंग बूथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 06:23 AM2020-05-19T06:23:53+5:302020-05-19T06:24:22+5:30
रायगड जिल्ह्यामध्ये चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या आधी आणि नंतर मोठ्या संख्येने नागरिकांचे लोंढे सरकत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. या ठिकाणच्या नागरिकांची तातडीने कोरोना टेस्ट होणे गरजे आहे. त्याचप्रमाणे पीपीई किटचा वाढता खर्च रोखण्यासाठी तब्बल १२ स्वॅब टेस्टिंग बूथची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यामध्ये चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या आधी आणि नंतर मोठ्या संख्येने नागरिकांचे लोंढे सरकत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. परंतु कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. समाजामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची स्वॅब टेस्ट होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांची तपासणी करणे आवश्यक आहे. पीपीई किटची संख्या मर्यादित असल्यामुळे तपासणी करण्याबाबत मर्यादा आहेत. सध्या वाढत जाणाºया संशयित कोरोनाबाधित रुग्णांची स्वॅब सॅम्पल तपासणी जलद गतीने होण्यासाठी कोविड-१९ स्वॅब सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण रायगड जिल्ह्यात कार्यान्वित करण्यास सुरुवात करण्यात आली.
कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, नर्स वा तंत्रज्ञ यांचा रुग्णाशी खूप जवळून संपर्क येतो आणि त्यातून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. या स्वॅब टेस्टिंग बूथमुळे तपासणी करणाºया तंत्रज्ञ आणि रुग्णामध्ये सुरक्षित अंतर राहील. त्यामुळे रुग्णाच्या शिंकण्याचा किंवा खोकण्याचा थेट परिणाम होणार नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
नवीन तंत्रज्ञानावर आधारित एकूण १० स्वॅब टेस्टिंग क्यूब
रायगड जिल्ह्यात एकूण १२ ठिकाणी हे बूथ बसविण्यात आले आहेत. या विषाणूची लागण तपासणी करणाºयांना होऊ नये याकरिता जिल्ह्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारित एकूण १० स्वॅब सॅम्पल तपासणी बूथ (स्वॅब टेस्टिंग क्यूब) देण्यात आले आहेत. महाड तालुक्यासाठी दोन, माणगावसाठी एक, तळासाठी एक, पोलादपूरसाठी एक तसेच रोह्यासाठी दोन, श्रीवर्धनसाठी एक, म्हसळासाठी एक तर पालीसाठी एक असे एकूण दहा स्वॅब टेस्टिंग क्यूब दिले आहेत. त्याचप्रमाणे उरण येथील केअर पॉइंट हॉस्पिटल, उरण व कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दोन स्वॅब टेस्टिंग क्यूब दिले आहेत. याद्वारे पीपीई किटचा खर्च वाचेलच, पण त्यासह जादा संशयित रुग्णांची तपासणीही होऊ शकेल. यामुळे सॅम्पल कलेक्शन करता येऊ शकेल, असेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.