अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत २१० सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू केली होती.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेसाठी ३८ सामाजिक आरोग्य अधिकारी नेमण्याची कार्यवाही नुकतीच पूर्ण होऊन नेमण्यात आलेल्या या सामाजिक आरोग्य अधिकाºयांनी तालुका वैद्यकीय अधिकाºयांसमवेत ग्रामीण भागात उत्तम आरोग्यसेवा देण्यास सुरुवात केली आहे. दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सर्व प्रकारे अधिक सक्षम करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या ३८ सामाजिक आरोग्य अधिकाºयांच्या नेमणुकीमुळे जिल्ह्याच्या तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेला निश्चितच खंबीर साथ लाभली आहे. जिल्हा परिषद आरोग्य सभापती सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.रायगडमधील विविध तालुक्यांमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण पाहून त्याप्रमाणे पनवेल ८, उरण ५, माणगाव ५, अलिबाग ४, सुधागड ३, कर्जत ३, पेण २, महाड २, खालापूर २, रोहा १, म्हसळा १, पोलादपूर १ आणि मुरुड १ अशा पद्धतीने हे ३८ सामाजिक आरोग्य अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकाºयांसमवेत कोविड योद्धा म्हणून ग्रामीण भागात कोरोना विरुद्धचे युद्ध लढत आहेत.