CoronaVirus News in Raigad : रायगड जिल्ह्यातील ५८ ठिकाणे कोरोनाबाधित क्षेत्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 06:00 AM2020-05-17T06:00:28+5:302020-05-17T06:00:54+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून पनवेल तालुक्याची ओळख आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत २३४ कोरोनाबाधित सापडले आहेत.
अलिबाग : मुंबई महानगराला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यामध्येही कोरोनाने सहज शिरकाव केला आहे. १५ मेपर्यंत रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४६१ वर पोहोचला होता. त्यामुळे तब्बल ५८ ठिकाणे कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून पनवेल तालुक्याची ओळख आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत २३४ कोरोनाबाधित सापडले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये ९३, उरण-१०८, श्रीवर्धन-५, कर्जत-४, पोलादपूर-२, खालापूर-३, महाड-४, अलिबाग-४ तळा, पेण, मुरुड आणि माणगाव प्रत्येकी-१ असे एकूण ४६१ कोरोनाबाधितांची संख्या आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही कोरोनाचा विळखा पडला आहे. ज्या विभागात कोरोनाचा संसर्ग झालेले आढळले आहेत, ती ठिकाणे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहेत.
पनवेलमध्ये ४० क्षेत्र कोरोनाबाधित
जिल्हाभरात १४ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून ५८ ठिकाणे ‘कोरोना विषाणू बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल तालुक्यातील ४० क्षेत्रांचा समावेश आहे.
उरण तालुक्यामध्ये-६, अलिबाग आणि महाड प्रत्येकी-३, पेण, मुरुड, कर्जत, खालापूर आणि पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी-१ अशा कोरोनाबाधित क्षेत्रांचा समावेश असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.