CoronaVirus News in raigad: पीर खिंडीतील फकिरासाठी अवतरले ‘फरिश्ते’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 01:05 AM2020-05-02T01:05:54+5:302020-05-02T01:06:35+5:30

पीर खिंडीतील दाऊद बाबांना चिंता लागली होती ती आज बाबांच्या दरगाहमध्ये तेलाविना दिवा कसा पेटवायचा, नवनाथांच्या मंदिरामध्ये अगरबत्ती कोठून आणायची, अशा विंवचनेत असतानाच बाबांच्या समोर चार व्यक्ती प्रकटल्या.

CoronaVirus News in raigad: 'Angels' incarnate for the fakir in Pir Khindi | CoronaVirus News in raigad: पीर खिंडीतील फकिरासाठी अवतरले ‘फरिश्ते’

CoronaVirus News in raigad: पीर खिंडीतील फकिरासाठी अवतरले ‘फरिश्ते’

googlenewsNext

आविष्कार देसाई
अलिबाग : लॉकडाउनमुळे कोणताच भाविक दरगाहकडे फिरकत नव्हता. अन्नधान्यांची चणचण तर भासत होतीच; परंतु पीर खिंडीतील दाऊद बाबांना चिंता लागली होती ती आज बाबांच्या दरगाहमध्ये तेलाविना दिवा कसा पेटवायचा, नवनाथांच्या मंदिरामध्ये अगरबत्ती कोठून आणायची, अशा विंवचनेत असतानाच बाबांच्या समोर चार व्यक्ती प्रकटल्या. त्यांच्या हातामध्ये किराणा सामानाच्या पिशव्या होत्या. दाऊद बाबांनी एक कटाक्ष टाकत त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, ‘आवो बेटा... शायद उपरवालेने दिया जलाने के लिए फरिश्ते भेजे है...’ बाबांचे हे वाक्य ऐकताच त्या व्यक्तींचे डोळे पाण्याने डबडबले... त्यांनी दाऊद बाबांच्या पुढ्यात किराणा सामानाच्या पिशव्या ठेवल्या... बाबांनी मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत... ‘खूश रहो, आबाद रहो’, असा आशीर्वाद दिला.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाउन सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वार अशा सर्वच प्रार्थनास्थळांनाही टाळे लागले आहे. त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी, आराधनेसाठी कोणीच फिरकत नसल्याचे दिसते. अलिबाग तालुक्यातील पीर खिंडीतील डोंगरावर पीर बाबा यांचा दरगाह आहे. तेथील दाऊद बाबा (डेव्हिड) नावाची ८५ वर्षीय व्यक्ती येथे गेली ४० वर्षे सेवा करत आहे. सध्या लॉकडाउनचा त्यांनाही फटका बसला आहे. अन्नधान्याची चणचण भासत असल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली होती. ही बाब कुठ्यांची गोठी गावचे पोलीसपाटील जगन्नाथ पाटील यांनी अलिबाग-बागमळा परिसरातील लवेश नाईक, अलिबाग शहरातील नौशाद पटेल, संकल्प पाटील यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यानंतर या तरुणांनी एक-दोन महिने पुरेल एवढे आवश्यक सर्व किराणा सामान थेट त्यांनी दाऊद बाबांकडे पोहोचवले. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून निराधार, मजूर, विधवा महिला, वयोवृद्ध अशा नागरिकांना मदतीचा हात लवेश नाईक, नौशाद पटले यांनी दिला आहे.
मास्क, सॅनिटायझर, किराणा मालाचे वाटप ते करत आहेत. ज्यांना मदत लागेल त्यांच्यासाठी ते धावत आहेत. आता मात्र त्यांचा खिसाही रिकामा झाला आहे. नागरिकांनी अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन लवेश यांनी केले आहे.
आज जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण झालेले आहेत. अशा प्रसंगी लवेश आणि नौशाद यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य माणूसपण जपणारे तरच आहेच. शिवाय प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे, एवढे मात्र निश्चित आहे.
>दाऊद बाबा हे काही वर्षांपूर्वी मद्रासवरून अलिबागमध्ये आले होते. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांनी सुरुवातीला सरकारी कंपनीमध्ये काम केले. त्यानंतर ते येथील पीर बाबांच्या दरगाहमध्ये आले होते.
तेव्हापासून ते येथेच राहतात, असे नौशाद पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेली ४० वर्षे ते दरगाहजवळ एक छोटीशी खोली आहे, तेथेच राहतात. डोंगरावर वीज नाही फक्त दोन विहिरी आहेत.
त्याचे पिण्यासाठी पाणी वापरतात. दर गुरुवारी मुस्लीम बांधव या ठिकाणी दर्शनासाठी येतात. त्यामुळे दाऊद बाबांची गुजराण सुरू होती.लॉकडाउनमुळे त्यांच्यावर संकट कोसळले होते, असेही नौशाद यांनी स्पष्ट केले. आम्हाला त्यांना मदत करता आली यातच आमचे समाधान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
>आम्हाला जेव्हा कळले की, बामणगाव येथील डोंगरावर पीर बाबांच्या दरगाहमध्ये सेवा करणाºया दाऊद बाबांना मदत हवी आहे.
आम्ही तातडीने तेथे पोहोचलो. बाबांच्या दरगाहमध्ये तेलाविना दिवा कसा पेटवायचा, नवनाथांच्या मंदिरामध्ये अगरबत्ती कशी लावायची, अशा विवंचेनत दाऊद बाबा होते.
आता तुम्ही आलात सर्व प्रश्न सुटले आहेत. उपर वालेने तुम्हे भेजा हैं, असे दाऊद बाबांनी सांगताच आम्हाला गहिवरून आले, असे लवेश नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: CoronaVirus News in raigad: 'Angels' incarnate for the fakir in Pir Khindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.