बिरवाडी : एका कोरोनाबाधित महिलेने मुंबईतून पलायन करीत महाड तालुक्यातील करमर येथील मूळगावी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोग्य विभागाच्या सतर्क तेमुळे पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच तपासणी करून या महिलेला उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.एका २७ वर्षीय विवाहित महिलेला विषाणूची बाधा झाल्याचे मुंबईतील रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले होते. तिची चाचणी ११ मे रोजी पॉझिटिव्ह असताना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल न होता या महिलेने मुंबईतून पलायन करीत करमर या गावी येण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महिलेची महाड तालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केली असता वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर या महिलेला महाड ग्रामीण रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे.महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी ई. सी. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.तक्रार दाखल होणारया प्रकरणी आरोग्य विभागामार्फत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी ई. सी. बिराजदार यांनी दिली.
CoronaVirus News in Raigad : मुंबईतून पळून गेलेली महिला अखेर रूग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 3:44 AM