CoronaVirus News : जेएनपीटी उभारतेय आणखी एक कोविड सेंटर, राज हिंगोरानी यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 07:14 AM2020-07-15T07:14:21+5:302020-07-15T07:14:49+5:30
उरण परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे. उरणमध्ये एका कोरोना रुग्णाने सुरू झालेला प्रवास ११२ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही सव्वापाचशे रुग्णांपर्यंत पोहोचला आहे.
उरण : जिल्हाधिकारी आणि बंदरातील काही कामगार संघटनांनी केलेल्या मागणीनंतर जेएनपीटीच्या माध्यमातून कामगार वसाहतीमधील ट्रॉमा सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी आॅक्सिजनची सुविधा असणारे २४ बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. जेएनपीटी कामगार आणि उरणमधील पहिल्या स्टेजमधील कोरोना रुग्णांसाठी हे सेंटर उपयोगात आणले जाणार असून, येत्या दोन आठवड्यांत हे सुसज्ज कोविड सेंटर सुरू होणार असल्याची माहिती जेएनपीटीचे वरिष्ठ मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राज हिंगोरानी यांनी दिली.
उरण परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे. उरणमध्ये एका कोरोना रुग्णाने सुरू झालेला प्रवास ११२ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही सव्वापाचशे रुग्णांपर्यंत पोहोचला आहे. कोरोनाच्या विळख्यात सध्या गाव, शहर, औद्योगिक क्षेत्रही सापडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत असल्याने, रुग्णांची संख्याही कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
वाढत्या रुग्णांमुळे उरण परिसरात असलेली बोकडवीरा येथील १२० आणि ४० बेडची व्यवस्था असलेली दोन्ही कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाली आहेत, तसेच जेएनपीटीने तयार केलेल्या १६ बेडच्या कोविड सेंटरमध्येही आता जागा उरली नाही. त्यामुळे कोविडच्या लोरिस्क आणि हायरिस्कच्या रुग्णांवर उपचार करणे सोडाच, पण पहिल्या टप्प्यातील साध्या रुग्णांवरही दाखल करून उपचार करणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच सोयीसुविधा आणि डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आदी स्टाफच्या कमतरतेमुळे तर पहिल्या टप्प्यातील कोरोनाच्या साध्या रुग्णांनाही पनवेल, एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्याची पाळी उरणच्या आरोग्यसेवेवर येऊन ठेपली आहे. मात्र, पनवेल, नवी मुंबईतील कोविडच्या रुग्णालयात जागा नसल्याने रुग्णांना पुन्हा माघारी पाठविण्यात येते. त्यामुळे कोविड सेंटरमधील सोयीसुविधा आणि डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबाय आदी स्टाफच्या कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे
यांनी दिली.
डॉक्टर्स, नर्सेसची व वॉर्डबॉयसह इतर कर्मचाऱ्यांची कमतरता
- जेएनपीटी रुग्णालयाच्या दुसºया मजल्यावर २४ बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. याआधी आॅफिसर क्लबमध्ये १६ बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले होते. मात्र, तेथील कोविड सेंटर बंद करून नवीन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याचे कामही अलीकडेच सुरू करण्यात आले आहे.
- नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचीही व्यवस्था करण्यात येत आहे. येत्या पंधरवड्यात काम पूर्णत्वास जाईल. त्यानंतर, हे कोविड सेंटर उरणकरांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी सीनियर सीएमओ
डॉ. राज हिंगोरानी यांनी दिली.
- डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबाय आदी स्टाफच्या कमतरता भेडसावत आहेत. याबाबत जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनाही कळविण्यात आले आहे. तोपर्यंत उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवरच कोविड सेंटरचे कामकाज चालविण्यात येणार असल्याची माहितीही
डॉ. राज हिंगोरानी यांनी दिली.
कोविड रुग्णांसाठी पुढाकार : उरण परिसरातील कोविड रुग्णांना उपचार मिळण्यासाठी जेएनपीटीने पुढाकार घ्यावा, अशा सूचना रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलेल्या होत्या. त्यानंतर, जेएनपीटी बंदरातील कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील, जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे सचिव रवींद्र पाटील, अंतर्गत कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश घरत आदी कामगार संघटना आणि आजी-माजी कामगार ट्रस्टींनी केलेल्या मागणीनंतर जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी कोविड सेंटर उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानंतर, बोकडवीरा येथील सिडकोच्या प्रशिक्षण केंद्रात जेएनपीटीच्या माध्यमातून १२० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले असून, त्यामधील सुमारे २५ बेडसाठी आॅक्सिजनचीही व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती डॉ. राज हिंगोरानी यांनी दिली.