CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांसाठी तीन बेड राखीव; जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:51 AM2020-10-08T00:51:03+5:302020-10-08T00:51:13+5:30
आम्ही कोरोना योद्धे नाहीत का? संघटनेचा सवाल
- आविष्कार देसाई
रायगड : जिल्हा सरकारी रुग्णालयात नव्याने आयसीयू आणि आॅक्सिजन बेड उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलीस, पत्रकार आणि महसूल कर्मचारी यांच्यासाठी तीन बेड राखीव ठेवण्यात आले. मात्र, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश नसल्याने नाराजीचा सूर आहे. जिल्हा परिषदेचे कर्मचारी कोरोना योद्धे नाहीत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येमध्ये घट होत असली, तरी अद्याप कोरोना कायमाचा नामशेष झालेला नाही. सरकार आणि प्रशासन कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कर्मचारी, पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचारी हे कोरोना विरोधात पुढे होऊन काम करत आहेत. कोरोना विरोधातील लढाईमध्ये त्यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली. काही रुग्ण बरे झाले, तर काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
या खºया योद्ध्यांना कोरोनाबाबतचे उपचार तातडीने उपलब्ध होणे गरजेचे आहे. रुग्णालयांमध्ये वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी त्यांच्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये पाच बेड राखीव ठेवण्यात यावेत, अशी मागणी पुढे आली होती. मागील कालावधीत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सरकारने जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी नव्याने आयसीयू बेड आणि आॅक्सिजन बेडची निर्मिती केली. काहीच दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील नव्याने निर्माण केलेल्या अतिदक्षता विभाग आणि आॅक्सिजन बेडचे लोकार्पण पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. या अतिदक्षता विभागात ४० बेड तर ६० बेडला आॅक्सिजन साहाय्य दिले आहे.
यापैकी महसूल विभाग, पोलीस विभाग आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण तीन बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. मात्र, रायगड जिल्हा परिषद कर्मचाºयांसाठी बेड राखीव ठेवण्यात आले नाहीत.
एक बेड राखीव ठेवा
जिल्हा परिषदेचे कर्मचारीही ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करत आहेत. त्यांच्यासाठीही एक बेड राखीव ठेवणे गरजेचे आहे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटना रायगडचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी केली. कर्मचाºयांच्या हितासाठी गुरुवारी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांंना निवेदन देण्यात येणार असल्याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले.