CoronaVirus News: कंत्राटी आरोग्य सेविकांंचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:12 AM2020-06-14T00:12:23+5:302020-06-14T00:12:33+5:30
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन : कर्जतमध्ये आरोग्य सेविकांच्या पगाराचा प्रश्न
कर्जत : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अर्थात एनआरएचएम अंतर्गत काम करीत असलेल्या आरोग्य सेविका यांना मानधन दिले जात नाही. त्यामुळे त्या सर्व आरोग्य सेविका यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
कर्जत तालुक्यातील कंत्राटी आरोग्य सेविका गेली अनेक वर्षे काही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सेवेत कार्यरत आहेत तर त्यातील काही आरोग्य सेविका यांनी १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आहे. असे असताना राष्ट्रीय आरोग्य अभियान दरवर्षी त्यांच्याकडून अकरा महिन्यांचा करार करून घेत असते. त्याबदल्यात त्या कंत्राटी पद्धतीने काम करणाºया आरोग्य सेविकांंना अवघ्या ८ ते १० हजार रुपये प्रति महिन्यावर काम करावे लागते. आता त्यांच्या जागांसाठी नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तर आरोग्य विभागात काम करणाºया आरोग्य सेविकांना दुपटीने पगार दिला जात आहे. तसेच जुन्या कंत्राटी सेविका अनुभवी असतानादेखील नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य सेवेवरील वाढता ताण पाहता या कंत्राटी आरोग्य सेविकांच्या काम बंद आंदोलनाचा फटका रुग्णांच्या सेवेला बसण्याची शक्यता आहे.
मागण्या पूर्ण न केल्याने उचलले पाऊल
आरोग्य विभागात काम करणाºया आरोग्य सेविकांना दुपटीने पगार दिला जात आहे. तसेच नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शासनाकडे वेळोवेळी केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण न केल्याने याविरोधात आरोग्य सेविकांनी गुरुवारपासून
काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन कर्जत तालुका आरोग्य अधिकारी सी.के. मोरे यांना दिले आहे.