CoronaVirus News : माणगावमध्ये उपचाराअभावी तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 11:49 PM2020-06-22T23:49:55+5:302020-06-22T23:50:09+5:30
२० जून रोजी दुपारच्या सुमारास २४ वर्षीय तरुण रामजी काळू वाघमारे व त्याचा मित्र मनोहर नथू जाधव हे विळेकडून आंबिवलीकडे जात असताना, त्यांचा विळेजवळ अपघात झाला
गिरीश गोरेगावकर
माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघात झालेल्या तरुणाच्या नातेवाइकांना वारंवार १०८ क्रमांकावर कॉल करूनही तब्बल सहा तासांनंतर १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे, अखेर अपघातात जखमी युवकाचा मृत्यू झाला. २० जून रोजी दुपारच्या सुमारास २४ वर्षीय तरुण रामजी काळू वाघमारे व त्याचा मित्र मनोहर नथू जाधव हे विळेकडून आंबिवलीकडे जात असताना, त्यांचा विळेजवळ अपघात झाला, यावेळी त्यांना विळे येथील सामजिक कार्यकर्ते नीलेश वांजळे यांनी एका मिनिडोर रिक्षाने उपजिल्हा रुग्णालयात माणगाव येथे दुपारी ४ वाजता दाखल केले. यावेळी रामजी वाघमारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तसेच त्यांचा मित्र मनोहर याला किरकोळ मार लागल्याने, त्याला उपचार करून घरी सोडण्यात आले. मात्र, रामजीला दुखापत जास्त असल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी न्यावे लागेल, असे सांगितले. मात्र, तेव्हा उपजिल्हा रुग्णालयाकडील रुग्णवाहिका ही कोविडकरिता राखीव ठेवल्यामुळे १०८ वरील इमर्जन्सी सेवेला संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फोन करण्यात आला; परंतु १०८ कडून तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी वांजळे यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अपघाती तरुण हा आदिवासी गरीब कुटुंबातील असल्याने, त्यांच्याकडे खासगी रुग्णवाहिका भाड्याने करून जाण्याकरिता पैसे नाहीत, आपण काही तरी मार्ग काढावा.
तरीही रुग्णालयातून कोणतीच रुग्णवाहिका मिळत नसल्याने तब्बल सहा तास वारंवार १०८ ला फोन केला, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे पर्यवेक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनीही १०८ चे रायगड जिल्हा व्यवस्थापक किरण गायकवाड यांनाही त्यांच्या मोबाइलवर वारंवार फोन करून विनंती केली. मात्र, रात्री १२ च्या सुमारास १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली. जखमी रामजी वाघमारे याला केवळ १५ किमी इंदापूर येथे नेल्यानंतर मृत्यूने गाठले. त्यामुळे ती रुग्णवाहिका माघारी आणली गेली. या दरम्यान जखमी युवकाला माणगाव रुग्णालयात दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते नीलेश वांजळे यांनी कर्तव्यावर असणारे डॉ.डोईफोडे व डॉ.जशी यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत, रुग्णालय प्रशासनावर उपचारात निष्काळजी दाखविल्याचा गंभीर आरोप करत, रोष व्यक्त केला.
>ढिसाळ कारभार : रायगड जिल्ह्यात एकूण १०८ सेवेच्या २३ रु ग्णवाहिका आहेत. त्यातील आठ रुग्णवाहिका कोविडसाठी राखीव ठेऊनही गंभीर जखमी रुग्णांकरिता सहा तासांनतंर इमर्जन्सी सेवा उपलब्ध होत असेल, तर १०८ बाबतचा ढिसाळ कारभार चाललाय, याकडे लक्ष देणे व याबाबत दोषी असणाºयांवर कारवाई झाली पाहिजे, असा आरोप मृतांच्या नातेवाइकांकडून केला जात आहे.
>माझ्या मुलाला रात्री रु ग्णवाहिकेमधून पाठविल्यावर माझ्या मुलाने प्राण सोडला. तोपर्यंत आम्हाला रुग्णालयातील डॉक्टर उडवाउडवीची उत्तर देत होते, असे रामजी वाघमारेच्या आईने सांगितले.
>मी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो; परंतु आपण कोविडसह इतर कॉलवर रुग्णवाहिका असल्याने लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. माणगाव येथे असताना एक रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. याकरिता वेळ गेला, तरी लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
- किरण गायकवाड, रायगड जिल्हा व्यवस्थापक, १०८ सेवा