coronavirus: कोरोनाबाधितांचा आधार ठरताहेत परिचारिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:34 AM2020-05-12T01:34:59+5:302020-05-12T01:36:17+5:30
रुग्णांच्या जवळ २४ तास कोणी असेल, तर त्या परिचारिका आहेत. या परिचारिकांना आपले कुटुंबदेखील आहे. रुग्ण सेवा करून घरी परतत असताना, मी माझ्या सोबत काही घेऊन तर जात नाही ना, ज्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला नाहक त्रास होईल, अशी भीती कायम सतावत असते.
- आविष्कार देसाई
रायगड - रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या परिचारिकांचा आजच दिवस आहे. जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन त्या रुग्णांची सेवा करत असतात. आज जगभरामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सावट पसरले आहे. निष्पापांना त्याने लक्ष्य करताना लाखो नागरिकांना त्याने आपल्या मगरमिठीत घेतले आहे. त्यामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी जीवाचे रान करून कर्तव्य बजावत आहेत. कुटुंबापासून दूर असणाºया कोरोनाबाधित रुग्णांना आधारही त्याच देत आहेत.
रुग्णांच्या जवळ २४ तास कोणी असेल, तर त्या परिचारिका आहेत. या परिचारिकांना आपले कुटुंबदेखील आहे. रुग्ण सेवा करून घरी परतत असताना, मी माझ्या सोबत काही घेऊन तर जात नाही ना, ज्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला नाहक त्रास होईल, अशी भीती कायम सतावत असते. याच कारणासाठी घरी परतत असताना रुग्णालयातील गणवेश तेथेच ठेवून दुसरे कपडे परिधान करून घरची वाट धरावी लागते. दारात पाय ठेवण्याआधीच सॅनिटायझर हातावर घ्यावे लागत आहे. आंघोळ करूनच कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात जावे लागत आहे. त्यांच्या लहान मुलांच्या हे अंगवळणी पडले आहे. त्यामुळे तेसुद्धा थेट आईला जाऊन बिलगत नाहीत.
प्रक्षिणामुळे भीती दूर
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या जवळ कसे जायचे, आपल्याला काही झाले तर त्याचा संसर्ग आपल्या कु टुंबातील सदस्यांना होईल अशी भीती मनामध्ये घर करून होती. सरकारने योग्य प्रशिक्षण दिल्याने परिचारिका रुग्णालयातील एक परिवार आणि घरी एक परिवार यांच्यात ताळमेळ घालून काम करत आहेत.
कोरोनाच्या दहशतीमुळे रुग्णाजवळ जाताना भीती वाटायची. योग्य प्रशिक्षणामुळे आता भीती नाही. रुग्ण हे आपल्या विश्वासावरच रुग्णालयात भरती झालेले असतात. त्यामुळे त्यांना बरे करून सुखरूप त्यांच्या घरी पाठवणे हेच ध्येय आता उराशी बाळगले आहे. रुग्ण हे आमच्याच परिवारातील एक घटक आहेत.
- तेजश्री पाटील-म्हात्रे, जिल्हा रुग्णालय
रुग्ण कोणत्या जाती, धर्माचा अथवा पंथाचा आहे., यापेक्षा तो आपल्या विश्वासावर आला आहे. त्यामुळे निश्चितच जबाबदारी वाढते. रुग्णांची काळजी घेताना त्याहून अधिक काळजी आम्हाला आमच्या घरी जाताना घ्यावी लागत आहे. आम्ही आमच्या सोबत काय घेऊन तर जात नाही ना, यासाठी खूपच खबरदारी घ्यावी लागत आहे.
- यशोदा नाईक, जिल्हा रुग्णालय
माणूस अंथरुणाला खिळला, एखादा आजार जडला की रक्ताचे नातेही सैल होते. आपलीच माणसे दुरावतात. अशा वेळी रक्ताचे कुठलेही नाते नसताना आणि कोणत्याची नात्याचे संबंध नसताना रुग्णालयात आपलं म्हणून साथ देते, औषध देते, मानसिक आधारही तीच देते. काही सांगावेसे वाटले तर ऐकणारीदेखील तीच असते. अशा या जीवाभावाच्या ‘सिस्टर’ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त सलाम !