coronavirus: कोविड योद्ध्यांसाठी रुग्णालयात एक बेड राखीव, किमान पाच बेड राखीव ठेवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 02:41 AM2020-09-05T02:41:07+5:302020-09-05T02:41:23+5:30
कोरोना योद्ध्यांमध्ये पत्रकार, पोलीस, महसूल आणि आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होतो. जिल्हा सरकारी रुग्णालायमध्ये एकच बेड राखीव ठेऊन कोरोना योद्ध्यांची चेष्टा करत असल्याची टीका होत आहे.
रायगड : टीव्ही ९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोना आजारात ढिसाळ आरोग्य व्यवस्थेमुळे जीव गमवावा लागला होता. त्यामुळे सर्वत्रच टीकेची झोड उठली होती. रायकर यांच्यासारखी परिस्थिती कोरोना योद्ध्यांवर ओढवणार नाही, यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाने एक बेड राखीव ठेवण्याचे जिल्हा सरकारी रग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी जाहीर केले आहे.
कोरोना योद्ध्यांमध्ये पत्रकार, पोलीस, महसूल आणि आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होतो. जिल्हा सरकारी रुग्णालायमध्ये एकच बेड राखीव ठेऊन कोरोना योद्ध्यांची चेष्टा करत असल्याची टीका होत आहे. कोरोना योद्ध्यांसाठी किमान पाच बेड राखीव ठेवण्याची गरज असल्याची मागणी आता पुढे येत आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतो आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये पत्रकार, पोलीस, महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी हे फ्रंटवर येऊन काम करत आहेत. अशा वेळी त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एक आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत.
सरकारी रुग्णालयात आवश्यक
जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये किमान पाच बेड, तसेच खासगी रुग्णालयांमध्येही प्रत्येकी पाच बेड राखीव ठेवण्याची गरज आहे, असे सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी सांगितले. एक बेड देऊन जिल्हा आरोग्य यंत्रणा कोविड
योद्ध्यांची थट्टा करत असल्याकडेही
त्यांनी लक्ष वेधले.