अलिबाग : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न होताना दिसत आहेत. रायगड जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे. विशेषकरून येथील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध जलक्रीडा आणि नौकाविहार प्रकल्प सुरू आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने होणारी गर्दी टाळण्यासाठी जलक्रीडा आणि नौका विहार प्रकल्प तातडीने बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने दिले आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी शुकशुकाट असल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.जगभरात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्याने घातक विषाणूला रोखण्यासाठी सरकारसह प्रशासनाने पावले उचलली आहेत. गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो. त्यामुळे सातत्याने गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी विविध स्तरांवरून सूचना आणि आदेश दिले जात आहेत. याआधीच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, जलतरण तलाव, नाट्यगृह, चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. जत्रा, उरूस, समारंभ, सरकारी कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आलेली आहे.जिल्ह्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांच्या मनोरंजनासाठी अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, किहीम, मांडाव, मुरूड, काशीद, दिवेआगर यासह अन्य ठिकाणी जेट स्की, स्पीड बोट, बनाना राइड यासह अन्य जलक्रीडांची साधने आहेत. जलवाहतुकीचा वापर पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात. त्या ठिकाणी जमा होणारी गर्दी विचारात घेता मेरीटाइम बोर्डाने बंदी आदेश ३१ मार्च २०२० पर्यंत लागू केला आहे.जलप्रवासी वाहतूक ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेऊन गोफण-सानेगाव-गोफण, राजपुरी-दिघी-राजपुरी, दिघी-आगरदांडा (रो-रो), दिघी-आगरदांडा-दिघी या जलमार्गावरील जलप्रवासी वाहतूक सुरु ठेवण्यात येणार असल्याचे मेरीटाइम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सी.जे. लेपांडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बंदी आदेश धुडाकवून लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. देशी-परदेशी पर्यटकांच्या थेट संपर्कात येऊ नका, असेही आवाहन सी.जे. लेपांडे यांनी केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाने घेतलेला निर्णय चांगला असला तरी या कालावधीत रोजगार बुडणार आहे. काहींचे उदरनिर्वाहाचे हेच एकमेव साधन असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फणसाड अभयारण्य बंदबोर्ली-मांडला : राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना करण्यात येत असून प्रेक्षणीय स्थळे, पर्यटनस्थळे, गर्दीच्या ठिकाणी जमावबंदी आदेश देण्यात आले आहेत. मुरूड तालुक्यातील पर्यटनात प्रसिद्ध असलेले फणसाड अभयारण्य वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवरील आदेशाला अनुसरून बंद करण्यात आले असल्याची माहिती फणसाड वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी. भोसले यांनी दिली आहे.फणसाड अभयारण्यात राज्यातून तसेच देश-विदेशातून पर्यटक, येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवरील आदेशाला अनुसरून ३१ मार्चपर्यंत फणसाड अभयारण्य बंद ठेवण्यात आल्याची माहिती भोसले यांनी दिली.
Coronavirus : समुद्रावरील जलक्रीडा प्रकल्प बंदचे आदेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेरीटाइम बोर्डाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 2:13 AM