मुरुड : निसर्ग चक्रीवादळामुळेरायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. नारळ-सुपारीच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्याच्या इच्छेप्रमाणे सुपारी व नारळाच्या प्रत्येक झाडामागे मोठे आर्थिक साहाय्य करण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक हेतू असून, येत्या मंगळवारपर्यंत याबाबतचा शासकीय अध्यादेश निघणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना मोठी मदत प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.नांदगाव ग्रामपंचायतमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे प्राप्त झालेली रक्कम नागरिकांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली की नाही, याबाबतचा आढावा घेण्यासाठी खा.सुनील तटकरे आले होते. यावेळी नांदगाव ग्रामपंचायत सरपंच वैशाली पवार, उपसरपंच अस्लम हलडे, काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तटकरे यांनी कृषी विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे एक हेक्टरमध्ये नारळाची १५० झाडे तर सुपारीची १,३५० झाडे असतात, असे निकष आहेत, परंतु आम्ही हा निकष पाळणार नाही. शेतकºयांनी झाडांची सांगितलेली संख्याच आम्ही विचारात घेणार आहोत. जास्तीतजास्त रक्कम वादळग्रस्तांना मिळावी, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. नारळ-सुपारी व कोकम या पिकाचा रोजगार भूमी लागवड योजनेत समावेश केल्याने शेतकºयांना लागवडीसाठी येणारा खर्च व नवीन रोपेसुद्धा प्राप्त होणार आहेत. वादळग्रस्त भागात जेवढ्या दिवस वी ज नाही, तिथे सरासरी बिल स्वीकारले जाणार नाही. जेवढा वापर तेवढेच बिल ग्राहकाला गेले पाहिजे, या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.तहसीलदारांनी तातडीने कार्यवाही करावीखा.सुनील तटकरे यांनी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील नुकसानग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा झाली पाहिजे यासाठी तहसीलदारांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. केंद्र शासन राज्य शासनाला मदत करीत नाही, केंद्राची महाराष्ट्राकडे नेहमीच वक्रदृष्टी असते, अशी टीका यावेळी त्यांनी केली आहे. तीन महिन्यांचे वीजबिल एकदाच आल्याने लोकांना खूप त्रास झाला आहे. यासाठी सदरची रक्कम हप्त्याहप्त्याने भरण्याची सूट देण्यात आली आहे. वीजबिल मोठ्या रकमेचे आले असेल, तर पाहणी करून बिल त्वरित सुधारून देण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी सुनील तटकरे यांनी सांगितले.माध्यमिक हायस्कूलला मदतीचे धोरण : माध्यमिक हायस्कूल अनुदानीत असो वा विना अनुदानित असो, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून अर्थ विभागाकडे प्रस्ताव सादर होताच, जास्तीतजास्त दोन लाख रुपये मदत मिळणार आहे. हे पैसे जिल्हा परिषदेमार्फत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
coronavirus: निसर्ग चक्रिवादळात नुकसान झालेल्यांना झाडाप्रमाणे भरपाईचा अध्यादेश लवकरच, सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 1:15 AM