Coronavirus: रायगडमधील पनवेल महापालिका क्षेत्र ‘रेड झोन’मध्ये; रुग्ण वाढल्याने प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 01:01 AM2020-05-03T01:01:51+5:302020-05-03T01:02:05+5:30
लॉकडाउन शिथिल नाही; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांवर आणखी भर
वैभव गायकर
पनवेल : सध्याच्या घडीला केंद्र सरकारने जिल्हानिहाय झोन तयार केले आहेत. यामधील रेड झोनमधील जिल्ह्यात निर्बंध कायम राहणार आहेत. पनवेल तालुका हा रायगड जिल्ह्यात येतो. रायगड जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आहे. मात्र, पनवेलमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका क्षेत्रात रेड झोनची नियमावली कायम राहणार आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णांचा आकडा ९० पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १२ जणांचा सहभाग असल्याने पनवेल तालुक्यात बाधितांचा आकडा १०० पेक्षा जात असल्याने पनवेलमध्ये रेड झोनचे निर्बंध असणार असल्याची माहिती पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. विशेष म्हणजे, सध्याच्या घडीला पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. पनवेल तालुका रायगड जिल्ह्यात येत असल्याने रायगड जिल्हाचा सहभाग आॅरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेलमधील निर्बंध शिथिल होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
पनवेल पालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता यापूर्वीच पोलीस प्रशासनाने सर्वच चोख बंदोबस्त ठेवला आहे. पनवेलमध्ये खारघर, नवीन पनवेल, कामोठे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांच्या तुलनेत एकट्या पनवेलमध्ये ९० टक्के कोविड १९ चे रुग्ण आढळल्याने पनवेलकरांसाठी रेड झोनचे निर्बंध कायम असणार आहेत. आजच्या घडीला शेकडो नागरिकांचे कोविडचे नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. याकरिता प्रशासनाने सतर्कता म्हणून रेड झोनचे निर्बंध कायम ठेवले आहेत.
पनवेल परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. हा आकडा सुमारे १५०० पेक्षा जास्त आहे. संबंधित नागरिकांच्या १४ दिवसांच्या होम क्वारंटाइन कालावधी २८ दिवस करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे पनवेल परिसरात नागरिकांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची सूट नसून नागरिकांनी अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पनवेल परिसरात कोविडच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने याठिकाणी रेड झोनचे निर्बंध गरजेचे आहेत. पनवेल परिसरात रेड झोनचे निर्बंध कायम असणार आहेत. पोलीस आयुक्तांशीदेखील यासंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहे. - गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका
रेड झोनमधील नियमावली : जीवनावश्यक वस्तू व औषध वाहतुकीला परवानगी, आॅटो रिक्षा, खासगी टॅक्सीसह ओला-उबेरला परवानगी नाही. पास असलेल्या खासगी वाहनातून दोघांना परवानगी, दुचाकीवर एकास परवानगी, विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग, वैद्यकीय उपकरणे, औषध निर्माण व ई-कॉमर्सवरून जीवनावश्यक वस्तू तसेच खासगी कार्यालयात ३३ टक्के कर्मचाऱ्यांना परवानगी.