Coronavirus: पनवेलला हवी चाचणीसाठी स्वतंत्र लॅब; आरटीपीसीआरला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 01:22 AM2021-03-26T01:22:47+5:302021-03-26T01:23:00+5:30

अलिबागहून चाचण्यांचा अहवाल मिळण्यास जातात चार दिवस

Coronavirus: Panvel needs separate lab for testing; Delay to RTPCR | Coronavirus: पनवेलला हवी चाचणीसाठी स्वतंत्र लॅब; आरटीपीसीआरला विलंब

Coronavirus: पनवेलला हवी चाचणीसाठी स्वतंत्र लॅब; आरटीपीसीआरला विलंब

Next

वैभव गायकर 
पनवेल : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, पालिकेकडून कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल प्राप्त होण्यास चार दिवसांचा कालावधी लागत असल्याने चाचणी करणाऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्णसंख्या पनवेलमध्ये आहे. आरटीपीसीआरकरिता शासकीय लॅब अलिबागला असल्याने पनवेलमधील नागरिकांना अहवालासाठी चार दिवस थांबावे लागत आहे.

कोविडची लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करण्याचा सल्ला शासनाचा आरोग्य विभाग देत असतो. मात्र आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर तब्बल चार दिवस लागत आहेत. खांदा कॉलनीमधील एका कुटुंबाने पालिकेच्या पथकामार्फत सोमवारी आरटीपीसीआर केली. कुटुंबातील चार सदस्यांपैकी लहान मुलीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे पालिकेने गुरुवारी संबंधित कुटुंबियाला सांगितले. उर्वरित तीन सदस्यांचे अहवाल पालिकेला प्राप्त झाले नसल्याचे संबंधित विभागात कार्यरत असलेल्या पाटील या महिलेने सांगितले. 

असाच अनुभव अनेकांना येत असल्याने संबंधित अहवाल स्वॅब  टेस्ट दिलेल्या नागरिकांना प्राप्त होत नसल्याने घरातून बाहेर पडता येत नाही. आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल ४८ तासांत येणे क्रमप्राप्त असताना,  अहवाल प्राप्त होण्यास चार दिवस लागत असल्याने कोविड रुग्णांच्या माहितीसाठी उशीर लागत आहे. 

यामुळे संबंधित रुग्णांमार्फ़त कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पनवेल महानगरपालिकेची स्वतःची लॅब नसल्याने कोविडबाबत पालिका क्षेत्रात सावळागोंधळ निर्माण झाला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या शेजारील नवी मुंबई महानगरपालिकेची स्वतःची लॅब आहे. पनवेलमध्ये पालिका क्षेत्रात दररोज ३००, तर ग्रामीण भागात १०० आरटीपीसीआर टेस्ट शासनामार्फत केल्या जात आहेत. 

वीकेंडला अँटिजन चाचणी बंधनकारक

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्तांनी या क्षेत्रातील कोरोना नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः शॉपिंग मॉल आणि डिपार्टमेंट स्टोअर्सनी नव्या नियमानुसार काम केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच ते पूर्ण बंद करण्याचा इशाराही, आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नव्या आदेशाद्वारे दिला आहे.

शॉपिंग मॉल्स आणि डीमार्ट, स्टार बाजार, रिलायन्स फ्रेश यांसारख्या डिपार्टमेंट स्टोअरसाठी त्यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. शॉपिंग मॉलमध्ये दर शुक्रवारी सायंकाळी ४.०० नंतर शनिवार आणि रविवारी येणाऱ्या प्रत्येकाची अँटिजन कोविड चाचणी बंधनकारक राहील.  मास्कशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये, तापमान तपासूनच प्रवेश दिला जावा, ताप किंवा तापसदृश लक्षणे आढळल्यास प्रवेश देऊ नये, प्रवेशद्वारावर सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, यासाठी पुरेसे मनुष्यबळ व्यवस्थापनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात यावा. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पहिल्या दोन वेळी प्रत्येकी २५ हजारांचा दंड आकारला जाईल तर तिसऱ्या वेळी उल्लंघन करणाऱ्या शॉपिंग मॉल, डिपार्टमेंट स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
 

Web Title: Coronavirus: Panvel needs separate lab for testing; Delay to RTPCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.