अलिबाग - कोरानाच्या विषाणूला रोखण्यासाठी जिल्ह्यात जमाबंदी पाठोपाठ आता संचार बंदीही लागू करण्यात आली आहे. या कालावधीत काही नागरिक बिनकामाचे घराबाहेर पडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारावाईचा बडगा उगारला आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 396 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 97 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बिनाकामाचे घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी उठा-बशा काढण्याची शिक्षाही देऊन टाकली आहे.देशात, राज्यात आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत. सुरुवातीला जनता कर्फ्यू, कलम 144 आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता विविध दुकाने, अस्थापने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महत्वाच्या कामा व्यतीरिक्त नागरिकांनी बाहेर पडण्याला मज्जाव केलेला आहे. मात्र नागरिक भाजीमार्केट, मासळी मार्केट, किराणा मालाची दुकाने तसेत रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे अधोरेखित होते.त्यामुळे पोलिसांना आता कडक अंमलबजावणी करावी लागत आहे. 22 आणि 23 मार्च 2020 अशा सलग गेल्या दोन दिवसांमध्ये पोलिसांनी अनुक्रमे 60 आणि 336 वाहन चालकांवर कारवाई केली आहे, तर अनुक्रमे 16 हजार 900 आणि 80 हजार 400 असा एकूण 97 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे.