पनवेल : शासनाने दारूविक्रीची परवानगी देताच सोमवारी तळीरामांनी शहरातील दुकानांसमोर गर्दी केली होती. एकीकडे स्थलांतरित मजूर गावी जाण्यासाठी धडपडत आहेत. याकरिता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. तर दुसरीकडे तळीराम मद्यासाठी गर्दी करीत आहेत. लॉकडाउनमध्ये विरोधाभासाचे हे चित्र शहरात पाहायला मिळाले.
पनवेल परिसरात लाखोंच्या संख्येने स्थलांतरित मजूर आहेत. लॉकडाउनमुळे सर्व व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झाल्याने शहरातील मजूर गावाकडे जाण्यासाठी निघाला आहे. यासाठी शासनाने परवानगी दिली असती तरी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत आहेत. यामध्ये आरोग्य अहवाल महत्त्वाची बाब आहे. याकरिता स्थानिक प्रशासनाने मजुरांना अर्ज वितरित केले आहेत. अर्जासह आरोग्य अहवाल स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करावयाचा आहे. या सर्व प्रक्रियेसाठी ठिकठिकाणी स्थलांतरित मजुरांची गर्दी पाहावयास मिळत आहे. सोमवारी मद्यविक्रीची दुकाने खुली झाल्याने तळीरामांनी गर्दी केली होती.
परप्रांतीय स्थलांतरित मजूर तसेच महाराष्ट्रातील परजिल्ह्यातील नागरिकांना सध्याच्या घडीला वाहतूक पास मिळविण्यास मोठी किचकट प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. ही प्रक्रिया शिथिल करण्याची मागणी नगरसेवक लीना गरड यांनी केली आहे. प्रशासनाने नव्याने नियमावली तयार करून त्यांना वाहतूक पासेस उपलब्ध करून देण्याची मागणी गरड यांनी केली आहे.सध्याच्या घडीला नऊ हजार स्थलांतरित मजुरांची नोंदणी आमच्याकडे झाली आहे. उर्वरित नोंदणी सुरू आहे. संबंधितांकडे वाहने नसल्याने त्यांना रेल्वेनेच पाठवावे लागणार आहे. अद्यापपर्यंत याबाबत निर्णय झालेला नाही. - अशोक दुधे, उपायुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, परिमंडळ २मद्यविक्री संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अद्याप कोणतीही परवानगी प्राप्त झालेली नाही. पनवेलमध्ये वाइन शॉपबाहेर केवळ मद्य खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. मात्र कुठेही मद्याची विक्री झाली नाही. - अविनाश रणपिसे, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पनवेल