विजय मांडे
कर्जत : टीव्ही लावा कोरोनाची बातमी, व्हॉट्सअॅप उघडा कोरोनाबद्दल माहिती, कुणी भेटले तरी कोरोनाच नाव काढल्याशिवाय राहत नाही. घरा-दारात कोरोनाच्याच गप्पा. इतकेच नव्हे, तर कोरोनावरून जोक्ससुद्धा आपण ऐकतो, वाचतो. दहाही दिशेला कोरोनाचाच विषय. हे सारं आपण आत्ता तीन-चार महिने अनुभवतो आहोत. हा कोरोना आला कुठून, कुणी आणला, कोरोनाचे विषाणू तयार केलेत की नैसर्गिक आहेत. याबद्दल कोणालाच ठोस सांगता येत नाही. या कोरोनाने जीवनशैलीच बदलून टाकली आहे. इतकेच काय, पण भविष्यात काय वाढून ठेवलंय? याचा अंदाजसुद्धा कुणाला करता येत नाही. इतका महाभयंकर हा कोरोना आहे. त्याच्यावर अजूनही प्रभावी औषध निघाले नाही. मात्र, या विषाणूने सर्वांचीच झोप उडवली आहे. आज या कोरोनाला शंभर दिवस होत आहेत.
कोरोनाचा संसर्ग भारतात आला सुरुवातीला त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही. सारे काही म्हणजे विमाने, रेल्वे, एसटी सेवा सुरू होत्या. मात्र, कोरोनाने झपाट्याने पाय पसरले आणि सर्वच जागे झाले. २२ मार्चला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली. सरकारी व खासगी वाहतूक बंद केली. कधी नव्हे, ती रेल्वेसेवाही बंद करण्यात आली. हे सारे अचानक झाल्याने अनेक परप्रांतीय अडकून पडले. त्यांना श्रमिक ट्रेनने आपापल्या गावी पाठविण्यात आले. ते गेल्याने विशेषत: बांधकाम व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला. अनेकांची कामे ठप्प आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये व्यत्यय आला. दहावीचा भूगोलाचा पेपर होऊ शकला नाही. दोन्ही परीक्षांचे निकाल कधी लागतील सांगता येत नाही. शाळा-महाविद्यालयांमधील परीक्षाच झाल्या नाहीत. शाळा-महाविद्यालये कधी सुरू होतील, त्याची निश्चितता नाही. खासगी शाळा- महाविद्यालयांतील शिक्षकांची पगारावाचून परवड होत आहे.
तालुका, जिल्ह्याच्या सीमा सील केल्याने नोकरदार, व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला. अनेक खासगी कंपनीत काम करणाऱ्यांच्या नोकºया गेल्या. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. नोकरी करणाऱ्यांनी शहरात घरे घेतली काहींनी वाहने घेतली, त्यांचे हप्ते कसे फेडायचे? काहींचे मानसिक संतुलन बिघडले आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणारे उदा. फेरीवाले, नाक्यावरील मजूर यांची चांगलीच उपासमार झाली. त्यांच्या घरी सुरुवातीला अन्नही शिजत नव्हते. मात्र, काही दानशूर व्यक्तींनी, सामाजिक संस्थानी अन्न-धान्य पुरविल्याने अनेकांच्या चुली पेटल्या. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना काही संस्थांनी भोजन पुरविले. सरकारनेही मोफत रेशनिंग दिल्याने तूर्तास उपासमार थांबली.
कोरोनाचा ससेमिरा टाळण्यासाठी असंख्य परप्रांतीय आठशे-हजार किलोमीटर चालत निघाले. अनेकांची दमछाक झाली. काही जण मोटरसायकलवरून ट्रिपल सीट निघाले. कुणी ट्रकचा, दुधाच्या टँकरचा तर काहींनी कंटेनरचा मार्ग निवडला. काहींना पोलिसांनी पकडून क्वारंटाइन केले, तर काही सुखरूप पोहोचले. मात्र, त्यांच्या राज्याच्या सीमेवर गेल्यावर ‘महाराष्ट्राचे गुणगान’ त्यांना गायला लागले.अशी ‘वागणूक’ त्यांना त्यांच्या प्रांतातील सत्ताधाºयांकडून मिळाली. मुंबईतील चाकरमानीही आपल्या कुटुंबाच्या लव्याजम्यासह पायीच कोकणात पोहोचले. काही जण वाहने घेऊन आणि कोरोनासुद्धा बरोबर घेऊन कोकणात गेले. बहुतेकांना त्यांच्या आप्तस्वकीयांनीच शाळांमध्ये क्वारंटाइन करणे भाग पाडले.पर्यटनस्थळे बंद असल्याने बुडाला रोजगारविवाह सोहळ्यांवर केवळ ५० माणसांचे बंधन आल्याने व थाटात हळदी समारंभ नसल्याने मंडप नाही, बेंजो नाही, डीजे नाही, जेवणावळी नाहीत. त्यामुळे लग्नाचे हॉल, रिसॉर्टमधील अनेक जण बेरोजगार झाले. अंत्यसंस्कारालाही २० जणच उपस्थित राहू शकतात. त्यामुळे अनेकांना घरीच शोक करावा लागला. मंदिरे बंद झाल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पर्यटनस्थळे बंद असल्याने तेथील सर्वच जण अगदी गाइडपासून साधे लॉज, हॉटेल्स, पंचतारांकित हॉटेल्स बंद पडली. अनेकांचे रोजगार बुडाले. सुट्टीचा मोसम असूनही कुठे बाहेर पडता येत नाही. त्यामुळे गृहिणी आणि लहान मुलांची चांगलीच पंचाईत झाली. त्यांना घरातच कोंडून ठेवावे लागतेय. उद्याने असूनही ती ओस पडली आहेत. तर बाहेर जाताना मास्क, सॅनिटायझर अनिवार्य झाले.पोलीस विभाग आणि आरोग्य विभागातील कर्मचाºयांना कोरोनाने ग्रासल्याने सर्वच परिस्थितीवर ताण आला. या काळात खरच आजारी असलेले रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येईल, त्या भीतीने घरीच आजीबार्इंच्या बटव्याचा आधार घेऊ लागला. मॉल, थिएटर्स बंद असल्याने कित्येक जण घरी बसले. जिम सुरू नसल्याने अनेकांच्या शरीराची रुंदी व वजने वाढली.