coronavirus: रायगड जिल्ह्यात दीड महिन्यात 65 जणांचा मृत्यू, सात दिवसांत दोन हजार कोरोना रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 01:43 AM2021-04-01T01:43:38+5:302021-04-01T01:44:38+5:30
रायगड जिल्ह्यात काेराेनाच्या रुग्णसंख्येचा विस्फाेट झाला आहे. दर दिवसाला २ जणांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळे मागील दीड महिन्यात ६५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
- निखिल म्हात्रे
अलिबाग : रायगड जिल्ह्यात काेराेनाच्या रुग्णसंख्येचा विस्फाेट झाला आहे. दर दिवसाला २ जणांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळे मागील दीड महिन्यात ६५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या सात दिवसात सुमारे दोन हजार रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्याने हा काेराेनाचा हाॅटस्पाॅट ठरत आहे. सरकार, प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अन्यथा काेराेनाचा उद्रेक अटळ असल्याचे चित्र आहे. (In Raigad district, 65 people died in a month and a half, two thousand corona patients were registered in seven days)
मागील दोन महिन्यांपासून काेराेनाचा संसर्ग थांबला हाेता; मात्र आता काेराेना विषाणूचा उच्चांक झपाट्याने वाढत असल्याचे चित्र सध्याच्या आकडेवारीवरुन समाेर आले आहे. अनलाॅकनंतर सर्वच व्यवहारांना सरकारने ढील दिल्याने आणि नागरिकांच्या बेफिकिरीमुळे काेराेनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. मागील ११ दिवसात दोन हजार रुग्ण सापडल्याने सरकार आणि प्रशासन चांगलेच चक्रावून गेले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये काेराेनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्या खालाेखाल पनवेल ग्रामीण आणि त्यानंतर उर्वरित रायगडचा क्रमांक लागताे. मायानगरी मुंबई आणि नवी मुंबईला अगदी खेटून पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूर तालुके आहेत. तसेच अलिबाग आणि पेण तालुक्यातून कामानिमित्त माेठ्या संख्येने नागरिक मुंबईमध्ये जात असल्याने या ठिकाणची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
रायगड जिल्ह्यात आजपर्यंतची रुग्णसंख्या ७२ हजार ०१८ वर पाेहोचली आहे. तर ६६ हजार ४८३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार १६१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समाेर आले आहे.
होम आयसोलेशनमधील रुग्णांकडे लक्ष द्या
सध्या होम आयसोलेशनमध्ये असलेल्या २ हजार ९८१ व्यक्तीकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांना पोषक आहार घेतल्याने त्यांना शारीरिक दृष्ट्या पोषक होणार आहे.
कर्जतमध्ये दोन दिवसांत नवीन १८ कोरोना पॉझिटिव्ह
कर्जत : तालुक्यात कोरोनाचा जोर कमी - जास्त होत आहे. बुधवारी नवीन १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मंगळवारी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. गेल्या दोन दिवसात १८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून, त्यामध्ये बहुसंख्य रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात चिंताजनक वातावरण आहे.
आजपर्यंत तालुक्यात २,११५ रुग्ण सापडले असून, १,९४० जणांनी कोरोनावर मात केली आहे तर ७२ जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. बुधवारी कर्जतमधील ४६ वर्षीय प्रौढाचा, दहिवलीमधील ३१ वर्षीय तरुणाचा, नेरळमधील ४० वर्षीय प्रौढाचा, ४२ वर्षीय महिलेचा, २३ वर्षीय तरुणीचा, माथेरानमधील ५४ वर्षीय प्रौढाचा, ५२ वर्षीय प्रौढाचा, ३६ वर्षीय प्रौढाचा, कशेळेमधील ५२ वर्षीय प्रौढाचा, ३२ वर्षीय तरुणाचा, २८ वर्षीय तरुणाचा, साळोख तर्फ नीड गावातील २८ वर्षीय तरुणाचा, धमोते येथील ४६ वर्षीय प्रौढाचा, बांधिवली गावातील २७ वर्षीय तरुणीचा, माले गावातील २८ वर्षीय तरुणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी पाषाणे गावातील २९ वर्षीय तरुणाचा, डोंगरपाडा गावातील २६ वर्षीय तरुणीचा, माथेरानमधील ३६ वर्षीय प्रौढाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शहरात अचानकपणे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे
वातावरण पसरलेले आहे. नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने कठोरपणे अंमलबजावणी
करावी असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
महाडमध्ये एकाच दिवशी २२ कोरोना रुग्णांची नोंद
महाड : महाड तालुक्यात बुधवारी एकाच दिवशी कोरोनाच्या नवीन २२ रुग्णांची नोंद झाली असून, यापैकी महाड शहरात १५ रुग्ण आढळून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाड शहरातील बाजारपेठेसह प्रमुख सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई होत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागत आहे. नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर केवळ एक दोन दिवस कारवाई करण्यात आली; मात्र नंतर याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी एकाच दिवशी महाड शहरात अचानक १५ रुग्ण पॅाझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. नवेनगर, तांबड भुवन, जुना पोस्ट, पंचशील नगर, मधली आळी, काकरतळे, गवळ आळी, रोहिदास नगर या ठिकाणच्या परिसरांत बुधवारी हे पॅाझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.