Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन लागले कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:10 AM2020-03-16T02:10:50+5:302020-03-16T02:12:32+5:30
रायगड जिल्ह्यातील कामोठे परिसरात कोरोनाची बाधा असलेल्या एका रुग्णाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
अलिबाग : कोरानाच्या प्रादुर्भावाचा वाढचा प्रभाव लक्षात घेता. रायगड जिल्हा प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रांताधिकारी तहसीलदार यांच्यासह अन्य यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला.
रायगड जिल्ह्यातील कामोठे परिसरात कोरोनाची बाधा असलेल्या एका रुग्णाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेने जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांचा आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायतीमधील सर्वच शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जलतरण तलाव, नाट्यगृहे, चित्रपटगृहांबाबतही हाच नियम लागू करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार हा परदेशातून आलेल्या नागरिकांच्या माध्यमातून पसरत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातील यंत्रणांकडून
माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
पनवेल प्रवेशद्वारावर केल्या उपाययोजना
1रायगड जिल्ह्यातील कामोठे परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रायगड जिल्ह्याचे पनवेल हे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.
2पनवेलमधूनच रायगड जिल्ह्यात प्रवेश करता येतो. त्यामुळे याच प्रवेशद्वारावर कोरोनाबाधित, संशयितांना रोखण्यासाठी खारघर परिसरामध्ये ग्रामविकास भवनमध्ये २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
3त्याच ठिकाणी स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याने कोरोनाला रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिली. हा विभाग महापालिका क्षेत्रामध्ये असल्याने महापालिकेचे एमओएच यांच्या देखरेखीखाली प्रक्रिया पार पडणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
इंडिया बुल्स इमारतीत सामग्रीची अभाव
मोठ्या संख्येने विदेशातून येणाºया नागरिकांना एकाच ठिकाणी विलगीकरण केंद्र उभारण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी इंडिया बुल्सच्या कोन गावाजवळील रेंटल हाउसिंग स्कीममधील बिल्डिंग क्रमांक ३ व ४ या ठिकाणी १८ माळ्यांच्या इमारतीत १००० खोल्यांमध्ये विलगीकरण केंद्र उभारण्याच्या सूचना पनवेलच्या महापालिका आयुक्तांना केल्या होत्या.
मात्र संबंधित क्षेत्र पालिका कक्षेबाहेर असल्याने तसेच त्या ठिकाणी दळणवळणासाठी सोयीचे नसल्याने आयुक्तांनी त्या ठिकाणी विलगीकरण केंद्र तयार करणे शक्य नसल्याचे सांगत खारघर शहरातील सर्व सुविधायुक्त ग्रामविकास भवनाची निवड केली. यासंदर्भातील माहिती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयालाही कळवली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापार, उद्योग तसेच मॉल बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे पुढील काही दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी अन्नधान्यासह इतर आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्यावर भर दिला आहे.
ग्रामविकास भवनातील कर्मचारी गायब
1परदेश वारी करून आलेल्या नागरिकांना सतर्कता म्हणून खारघर शहारातील ग्रामविकास भवन येथे तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला.
2मात्र ही बातमी ऐकताच येथील कर्मचा-यांनी ग्रामविकास भवनातून पळ काढला. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाला येथील प्रशासनाच्या मार्फत कोणत्याही प्रकारचे सहकार्य झाले नाही.
3संबंधित नागरिक कोरोना संशयित आहेत असा समज ग्रामविकास भवनातील कर्मचा-यांचा झाल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर करत येथून पळ काढला. संबंधित प्रकाराबाबत आयुक्त गणेश देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्तव्य बजावण्याच्या वेळेला अशा प्रकारे पळ काढणे ही शरमेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.