Coronavirus in Raigad: परराज्यातील नागरिकांच्या दाखल्यांसाठी रांगा; अलिबाग जिल्हा रुग्णालयात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 01:59 AM2020-05-06T01:59:25+5:302020-05-06T01:59:39+5:30
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; पोलिसांची दमछाक
अलिबाग : शासनाने परराज्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात, गावात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार परराज्यातील नागरिक हे आपल्या गावी जायला मिळणार म्हणून आनंदित झाल्याने गावी जाण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी करू लागले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी दाखला घेण्यासाठी नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्या. या वेळी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
रुग्णालय तसेच पोलीस सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्याच्या सूचना देत असूनही नागरिक नियम डावलताना दिसत आहेत. काही करून आपल्या राज्यात, आपल्या गावी जायचे असा चंग रायगड जिल्ह्यात सध्या वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी बांधला आहे. आपल्या हक्काच्या घरी पोहोचण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. सकाळपासूनच कागदपत्र जमवणे, नोंदणी करणे, त्याचबरोबर वैद्यकीय चाचणी करून घेणे यासाठी झेरॉक्स दुकान, सायबर कॅफे, सरकारी रुग्णालये या ठिकाणी भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने अधूनमधून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे.
मंगळवारी सकाळपासूनच अलिबागच्या जिल्हा रूग्णालयासमोर तीन हजार मजूर रांगेत उभे होते. परराज्यातील नागरिकांनी सोडण्यासाठी जिल्हा प्रसासनाच्या विविध हालचाली सुरू असताना नागरिकांच्या अतिउत्साहाचा ताण पोलीस व रुग्णालय प्रशासनाला सहन करावा लागत आहे.
उरणमध्ये आरोग्य दाखल्यासाठी झुंबड : आरोग्य दाखल्यासाठी उरणमध्ये कामानिमित्त आलेल्या परप्रांतीयांनी रुग्णालयांसमोर गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. नागरिक तासन्तास रांगेत उभे असून गर्दीला आवर घालताना प्रशासनाची भंबेरी उडत आहे. राज्य शासनाने परप्रांतीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा आॅनलाइन फॉर्म भरून करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येकाला आरोग्य तपासणीच्या दाखल्याची गरज आहे. यामुळे शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयासह शहरातील पालवी रुग्णालय व इतर ठिकाणी रुग्णालयासमोर कामगारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला होता. गर्दीवर नियंत्रण आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे.