coronavirus: कोरोनामुळे पावसाळी पर्यटनावर पाणी, सुरक्षिततेसाठी सर्व पर्यटनस्थळे बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 11:58 PM2020-07-08T23:58:19+5:302020-07-08T23:58:31+5:30
या वर्षी कोरोनामुळे साडेतीन महिन्यांपासून सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. पावसाळ्यातही ती बंदच राहण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षीच्या पर्यटन हंगामावर पाणी फिरणार असून, स्थानिकांचा रोजगारही बुडणार आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : पावसाळी पर्यटनासाठी मुंबईकरांकडून सर्वाधिक पसंती पनवेलला मिळत असते. कर्नाळा किल्ला, अभयारण्य, कलावंतीन दुर्ग, प्रबळगड, इरशाळगड व या परिसरातील निसर्गासह धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. परंतु, या वर्षी कोरोनामुळे साडेतीन महिन्यांपासून सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. पावसाळ्यातही ती बंदच राहण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षीच्या पर्यटन हंगामावर पाणी फिरणार असून, स्थानिकांचा रोजगारही बुडणार आहे.
राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रायगडचा अग्रक्रमांक लागतो. गडकिल्ले, धार्मिक स्थळे, नैसर्गिक पर्यटनस्थळांचे वैभव या परिसराला लाभले आहे. पावसाळी पर्यटनासाठी जिल्ह्यात सर्वाधिक पसंती पनवेल तालुक्याला लाभत असते. पावसाळा सुरू झाला की कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होते. जूनपासून पावसाळा संपेपर्यंत अभयारण्य व कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी प्रत्येक महिन्याला १0 ते १५ हजार पर्यटक भेट देत असतात. येथून काही अंतरावर असणा-या इरशाळगड, कलावंतीन दुर्ग व प्रबळगड किल्ल्यांवरही प्रत्येक आठवड्यात सरासरी २ ते ५ हजार पर्यटक भेट देत असतात. गाढेश्वर धरण परिसर, मोरबे धरण, पांडवकडा व या डोंगररांगांतील इतर धबधबे पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड परिसरातील स्थानिक गावांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. प्रत्येक घरातील किमान एकतरी व्यक्ती हॉटेल, चहाची टपरी व इतर व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहे. प्रबळगडमाची या संपूर्ण गावचा रोजगार पर्यटनावर अवलंबून आहे. कर्नाळा अभयारण्यातही बचतगटाच्या माध्यमातून हॉटेल चालविण्यात येत आहे. वनव्यवस्थापन समितीमध्येही स्थानिकांना नोकरी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवली असल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
काजव्यांचा हंगामही गेला : कलावंतीन दुर्ग व प्रबळगडाला वर्षभर पर्यटक भेट देत असतात. कलावंतीन सुळका सर करण्यासाठी देश, विदेशातून पर्यटक येत असतात. पावसाळा सुरू झाला की या परिसरात रात्री लाखो काजवे दिसू लागतात. येथील वृक्षांवर चांदण्यांप्रमाणे काजवे चमकत असतात. ते मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मुक्कामासाठी प्रबळगड माचीवर जात असतात. या वर्षी तो हंगामही वाया गेला आहे.
कर्नाळा परिसरातही पसरली शांतता
पावसाळ्यात सर्वाधिक गर्दी कर्नाळा अभयारण्य व कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी होते. १२ चौरस किलोमीटर परिसरावरील या अभयारण्यात ६४२ प्रकारचे वृक्ष, १३४ प्रजातींचे स्थानिक व ३४ प्रजातींचे विदेशी पक्षी पाहावयास मिळतात.
गडावरील ऐतिहासिक अवशेष व वरून दिसणारा निसर्गरम्य परिसर यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु कोरोनामुळे साडेतीन महिने या परिसरातही शांतता पसरली आहे.
कर्नाळा अभयारण्यात गतवर्षी (२०१९) आलेल्या पर्यटकांची आकडेवारी
मार्च ७,५५१
एप्रिल ३,८९३
मे ३,९३८
जून १0,२८१
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कर्नाळा अभयारण्य व किल्ला परिसरात पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यानंतरच पर्यटकांना परवानगी दिली जाणार आहे. सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे.
- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा
कलावंतीन दुर्ग व प्रबळगड परिसर प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाला आहे. पर्यटन उद्योगावर येथील अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. परंतु सुरक्षेला प्राधान्य देत सद्य:स्थितीमध्ये पर्यटकांना या परिसरात मनाई केली आहे.
- एन. एन. कुप्ते, साहाय्यक वनसंरक्षक, पनवेल.
गवळीदेव धबधब्यावरही बंदी : नवी मुंबईमधील गवळीदेव धबधबा मागील काही वर्षांत पर्यटकांना आकर्षित करीत आहे. मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातूनही पर्यटक येथे येतात. या वर्षी गवळीदेव धबधब्यावरही सुरक्षेसाठी पर्यटकांना मनाई केली आहे.