Coronavirus : शाळा बंद, खासगी शिकवण्या सुरूच, सरकारी आदेशाचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:27 AM2020-03-17T02:27:42+5:302020-03-17T02:27:45+5:30

सध्या शाळांमध्ये शुकशुकाट आहे. परंतु खासगी शिकवण्या मात्र सुरू आहेत. या शिकवण्यांकडून सरकारी आदेशाची पायमल्ली होत असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Coronavirus : Schools closed, private tutoring started, government order violated | Coronavirus : शाळा बंद, खासगी शिकवण्या सुरूच, सरकारी आदेशाचे उल्लंघन

Coronavirus : शाळा बंद, खासगी शिकवण्या सुरूच, सरकारी आदेशाचे उल्लंघन

Next

कळंबोली : रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शाळांमध्ये शुकशुकाट आहे. परंतु खासगी शिकवण्या मात्र सुरू आहेत. या शिकवण्यांकडून सरकारी आदेशाची पायमल्ली होत असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पनवेल परिसरात खासगी शिकवण्या, कोचिंग क्लासची संख्या मोठी आहे. या ठिकाणी लाखो रुपये शुल्क आकारून विद्यार्थ्यांना कोचिंग दिले जाते. झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनापासून बचावासाठी केंद्र आणि राज्य सरकारने खबरदारीच्या अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
त्यामध्ये खासगी शाळांचाही समावेश आहे. त्यानुसार सोमवारपासून सर्व शाळांमधील किलबिलाट बंद झाला. मात्र पनवेल परिसरातील खासगी शिकवण्या, कोचिंग क्लास सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक क्लासेसमध्ये शेकडो विद्यार्थी एका ठिकाणी बसतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र केवळ प्रतिष्ठेसाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावरून खासगी कोचिंगवर कोणाचे नियंत्रण नसल्याचेही दिसून येत आहे. या शिकवण्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देणार असल्याचे नगरसेवक सतीश पाटील यांनी सांगितले.

पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्या आशयाचे पत्रक आयुक्तांनी जारी केले आहे. खासगी क्लासेस सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. परंतु पालकांनीसुद्धा पाल्यांना अशा प्रकारे खासगी क्लासेसमध्ये पाठवणे टाळले पाहिजे, असे आवाहन मनपाकडून करीत आहोत.
- जमीर लेंगरेकर,
उपायुक्त, पनवेल मनपा

राष्ट्रीय आपत्ती घोषित झाल्यानंतरही शिक्षणाचा बाजार मांडलेल्या लोकांनी पैशासाठी खासगी शिकवण्या चालू ठेवल्या आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवून खासगी शिकवण्या बंद करणे आवश्यक आहे.
- अ‍ॅड. श्रीनिवास क्षीरसागर,
कायदेतज्ज्ञ, नवी मुंबई

Web Title: Coronavirus : Schools closed, private tutoring started, government order violated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.