coronavirus: चाकरमान्यांच्या कुटुंबीयांचे गुरांच्या गोठ्या विलगीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 02:41 AM2020-05-16T02:41:18+5:302020-05-16T02:43:06+5:30
महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतींमध्ये ५ मे ते ९ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबई, सुरत, पुणे या शहरातून चाकरमानी कुटुंब आपल्या गावी दाखल झाले. मात्र, यातील एका कुटुंबाला विलगीकरण करताना चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये दहा दिवस ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाली.
- दीपक साळुंखे
बिरवाडी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसह गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, बडोदा येथील चाकरमान्यांनी आपल्या मूळ गावी येणे पसंत केले. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर या नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतीमधील शहरातून गावी आलेल्या चाकरमानी कुटुंबीयांचे विलगीकरण चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी या कुटुंबीयांना रायगड जिल्हा परिषद शाळा कातुर्डे नंबर १ येथील विलगीकरण कक्षामध्ये हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतींमध्ये ५ मे ते ९ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबई, सुरत, पुणे या शहरातून चाकरमानी कुटुंब आपल्या गावी दाखल झाले. मात्र, यातील एका कुटुंबाला विलगीकरण करताना चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये दहा दिवस ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाली. कातुर्डे ग्रामपंचायतींमध्ये एकूण २६ चाकरमानी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विविध शहरातून आपल्या मूळ गावी परतले असून, काहींना त्यांच्या निवासस्थानी होम क्वारंटाइन करण्यात आले. तर काहींना रायगड जिल्हा परिषद शाळा कातुर्डे येथील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. या नागरिकांची वैद्यकीय तपासणी महाड तालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्यकेंद्रात करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कोविड-१९ केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता महाड तालुक्यातील कोतुर्डे ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक ज्ञानेश्वर आंभोरे यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता विविध शहरातून दाखल झालेल्या चाकरमानी नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव विलगीकरण कक्ष तसेच त्यांच्या निवासस्थानी होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र, गुरांच्या गोठ्यामध्ये कुटुंबीयांचे विलगीकरण? या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. तर बिरवाडी राजिप कन्याशाळा येथील विलगीकरण कक्षामधील शौचालय नादुरुस्त असल्याने या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ घाडगे यांच्याजवळ संपर्क साधला असता शौचालय दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून नागरिकांची गैरसोय तत्काळ दूर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या- गोगावले
महाड तालुक्यातील ग्रामीण भागात दाखल होणाऱ्या चाकरमानी कुटुंबीयांच्या व्यवस्थेबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधला असता गावांमध्ये दाखल होणाºया त्यांच्या निवासस्थानीच होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ज्यांच्या घरी जागेचा अभाव असेल अशा कुटुंबीयांकरिता शाळांमधून विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत.
त्यांच्या भोजनाची व्यवस्था त्याच्या कुटुंबीयांमार्फत करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असेदेखील गोगावले यांनी सूचित केले आहे.
महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतीमधील शहरातून गावी आलेल्या चाकरमानी कुटुंबीयांचे विलगीकरण चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी या कुटुंबीयांना रायगड जिल्हा परिषद शाळा कातुर्डे नंबर १ येथील विलगीकरण कक्षांमध्ये हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पाणी जातेय वाया
महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना बिरवाडी कन्याशाळा येथील विलगीकरण कक्षातील पाणीपुरवठा करणारा नळ नादुरुस्त असल्याने रोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे.
महाडमधील २९५ शाळा अत्यावश्यक सेवेसाठी वापरणार
महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ३१३ शाळांपैकी २९५ शाळा या अत्यावश्यक सेवेकरिता वापरात आणण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती महाड पंचायत समिती यांच्यामार्फत देण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या सात शाळा पूर्णपणे नादुरुस्त झाल्या आहेत. अवकाळी वादळी पावसामुळे नादुरुस्त झालेल्या शाळांमध्ये दासगाव मराठी, बिरवाडी २, कांबळे उर्दू, वाकी बुद्रुक, जुई येथील दोन शाळांचा समावेश आहे.