CoronaVirus News: अलिबागमध्ये नवीन सात रुग्ण; बाधितांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:27 PM2020-06-14T23:27:40+5:302020-06-14T23:28:17+5:30
नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
अलिबाग : अलिबागमध्ये रविवारी एकाच दिवशी सात नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मोठे शहापूर येथील जेएसडब्ल्यू कंपनीचा कंत्राटी कामगार, चिंचवली येथील एक गृहिणी असे २ रुग्ण, तर बेलकडे गावात दोन, नेहुली-खंडाळे व मांडवी मोहल्ला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
मोठे शहापूर येथील एका ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. जेएसडब्ल्यू कंपनी, वडखळ येथे कंत्राटी कामगार असलेल्या या तरुणाची स्वॅब टेस्ट रविवारी पॉझिटिव्ह आली आहे. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. मोठे शहापूर येथील एका ४८ वर्षीय महिलेलाही कोरोना झाला आहे. ही महिला बोरीवली, मुंबई येथून गावी आली होती. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. तर भुनेश्वर चिंचवळी येथील ४८ वर्षीय महिला बोरीवली, मुंबई येथून गावी आली होती. तिच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
अलिबागमधील मांडवी मोहल्ला येथेही एका ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. इस्टेट एजंट असलेला हा रुग्ण मुंब्रा, ठाणे येथून अलिबागला आला होता. त्यास जिल्हा शासकीय रु ग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय नेहुली खंडाळे येथेही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नोंदविण्यात आला आहे. ५८ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
माणगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी
माणगाव : तालुक्यातील इंदापूर येथील ५० वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा शुक्रवार १२ जून रोजी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद प्रशासनाकडे केली आहे. शनिवार १३ जून रोजी माणगावमध्ये एक पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला असून तालुक्यात सध्या सात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे यांनी दिली.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून माणगाव तालुक्यात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील जवळपास २४ गावांतून आजपर्यंत ५४ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी इंदापूर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर ४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
माणगाव तालुक्यात लॉकडाऊन शिथिल झाल्याने नागरिक बेशिस्त व निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. दुकानासमोर तसेच बँका, एटीएम यांच्यासमोर फार मोठी गर्दी होताना निदर्शनास येत आहे. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने प्रशासन वेळोवेळी जनतेला सतर्क व जागरूक राहण्याच्या सूचना देत आहे, याचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी केले आहे.
पनवेलमध्ये ५७ नवे रुग्ण
पनवेलमध्ये रविवारी तब्बल ५७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. तर ४३ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.